सत्तेची दोरी…

 – पनवेलवाला…

स्थळ- (अर्थात वर्षा बंगला मुंबई. मुख्यमंत्री घरात शिरतात वहिनींकडे पाहात “काय आज संगीत रियाझ नाही वाटतं? त्यांचे लक्षच नाही.)
मुख्यमंत्री- अहो, आपल्याशी बोलतोय?
अमृता वहिनी – अं हं हे काय, केव्हा आलात?
मुख्यमंत्री- घ्या म्हणजे आता आमच्या मित्र पक्षांसारखी आपण दखल घेत नाही वाटतं.
वहिनी- अहो, हे काय विचारणं झालं? आणि असल्या कोट्या घरात करू नका.
मुख्यमंत्री – एवढा कसला विचार चालू आहे?
वहिनी- आता चार वर्षे पूर्ण होतील मुख्यमंत्री होऊन. पण एकंदरीत बाहेर वातावरण आता ठीक वाटत नाही. गोरखपूर आणि फुलपूर मधल्या पराभवाने आपल्याकडे काय होईल, हो? पूर्वीही युतीच्या काळात पंतांकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतले होते?

मुख्यमंत्री – तसे काही होणार नाही. मी माझा कालावधी पूर्ण करेन व पुन्हा मुख्यमंत्री होईन.
वहिनी- तुमच्या युतीतून हल्ली विस्तवही जात नाही. दरवेळी वेगवेगळ्या कारणांनी धमक्‍यांचे व चिमट्यांचे राजकारण चालू आहे. “मातोश्री’च्या मनात काय चालले आहे याचा ठाव लागत नाही.
मुख्यमंत्री- हे बघ, आता मोर्चे वगैरे संपलेले आहेत; बऱ्यापैकी कर्जमाफीही झालेली आहे.
वहिनी- थांबा. आपल्याकडील अस्तनीतील निखारेच आता पेटून उठू लागले आहेत. त्यांना कसे आवरणार? तुम्ही पडता साधे भोळे, इंजिनची शिट्टीही ओरडते की, “लादलेले मुख्यमंत्री’ आहेत म्हणून. त्यातून आता अण्णा पुन्हा उपोषणाला बसलेत. अण्णांचे उपोषण म्हणजे सत्ताधीशांना ग्रहण हे समीकरणच आहे.

मुख्यमंत्री – हो तो एखादा योगायोग असू शकतो. आणि ते उपोषण दिल्लीला आहे, येथे नाही. पण तू एवढी काळजी का करत आहेस? तू तुझं काम करत राहा. लोक काहीही बोलतील. काम केलं तरी बोलतील, नाही केलं तरी बोलतील. नदी वाचवण्यासाठी तुझे प्रयत्न चांगले होते. पण लोकांनी वेगळाच अर्थ काढला. तसेच तुझे नाव “पतंजली’शी जोडून उगाच आरडाओरड करताहेत. विरोधक म्हटला की कशालाही विरोध करावा असे समीकरणच आहे.
वहिनी- नाही. मागे युतीचे सरकार असताना पंत आपला पूर्ण कार्यकाळ करू शकले नाहीत व त्यांना जावे लागले. म्हणून आपली शंका वाटते की पुढे काय होईल आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक होईल की नाही?
मुख्यमंत्री – तसं काही होणार नाही पूर्वी युतीचा मुख्यमंत्री “मातोश्री’ वरून ठरत होता. आता तसे नाही. मला काम करायला पूर्ण मोकळीक आहे; म्हणून मी निर्धास्त आहे.

वहिनी- नाही; तुमच्याच काळात शेतकरी संप झाला, केवढी कर्जमाफी होऊन अजूनही मागणी आहेच. विरोधक एकत्र होत आहेत. काही जण पक्ष सोडून चालले आहेत, अंतर्गत विरोध वाढतच आहे. म्हणून जरा विचार करत होते की नागपूरहून मुंबईला आलो खरे पण आता पुढचे काही ठीक वाटत नाही.
मुख्यमंत्री – माझा माझ्या कामावर विश्‍वास आहे लोकच ठरवतील व आपले वरिष्ठही ठरवतील.
वहिनी- हो, पण तुमचे मित्र पक्षच तुम्हाला सोडून गेले तर? आता नाही चंद्राबाबू सोडून गेले?
मुख्यमंत्री – पण त्यांनी काही फरक पडला का?
वहिनी- हो, तिकडे दिल्लीला तुमचे बहुमत आहे पण तसे येथे नाही. नाही म्हटले तरीही “मातोश्री’च्या हाती सत्तेची दोरी आहे.

मुख्यमंत्री – असूदे असूदे, त्यांनाही सत्तेमध्ये राहायचे आहे, मग ते का पाठिंबा काढून घेतील?
वहिनी- हो; पण निवडणूक वर्षांत काहीही होऊ शकतं. त्यांनी पाठिंबा काढून घेतला तर तुम्हाला पायउतार व्हावे लागेल?
मुख्यमंत्री – त्याची काळजी करू नको. त्यांनाही सत्ता हवी आहे तू निर्धास्त राहा मीही राजकारणात मुरलेला आहे.
वहिनी- पण पाठिंबा काढलाच तर?
(मुख्यमंत्री गालातल्या गालात हसत घड्याळाकडे बघत असतात. घड्याळात रात्रीचे दहा वाजून दहा मिनिटे झालेली असतात.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)