सत्ताधाऱ्यांसह विरोधक रस्त्यावर एकवटले

वाघोली- फुरसुंगी -उरुळीदेवाची ग्रामस्थांनी महापालिकेचा कचरा टाकण्यास विरोध केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्याची मुदत घेऊन समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यानंतर महापालिकेने पिंपरी-सांडस येथे दोनवर्षांपूर्वी घेतलेल्या जागेमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीला वेग आला आहे. महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जागा शासनाकडून मिळविली असली, तरी याठिकाणी कचरा डेपो करण्याचाच घाट आखला जात असल्याचा आरोप करून पिंपरी-सांडससह परिसरातील 20 गावांनी याचा तीव्र विरोध केला आहे. कचरा डेपोला विरोध दर्शविण्यासाठी सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन आज (शुक्रवारी) सकाळी वाघोली (ता. हवेली) येथील केसनंद फाटा चौकात करण्यात आले. तर सकाळी 10 वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये निषेध सभा घेवून तीव्र विरोध करण्यात आला.
यावेळी महानगरपालिकेने वार्ड निहाय कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून शहराचा कचरा शहरातच जिरवावा, कचरा डेपो करण्यात येणाऱ्या जागेचे वनीकरण संपुष्टात येऊन शेतांना नुकसान होईल, महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या बोल्हाईमाता मंदिराचे अस्तित्व धोक्‍यात येईल, याच परिसरातून जाणाऱ्या विमानांना याचा धोका आहे, कचरा डेपोमुळे एक लाख लोकसंख्येवर परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या गाड्यांचा वाहतूक कोंडीला आणखी त्रास होणार असल्याचे मुद्दे उपस्थित करून विरोध करण्यात आला. निषेधसभेदरम्यान जालिंदर कामठे, अशोक पवार, प्रदीप कंद, संदीप भोंडवे, माणिक गोते, ज्ञानेश्‍वर कटके, सुभाष जगताप, चंद्रकांत वारघडे, लोचन शिवले, राजेंद्र खांदवे, रोहिदास उंद्रे, संदीप सातव, संजय सातव, महेश ढमढेरे, मिलिंद हरगुडे, श्रीहरी कोतवाल, कुशाबा गावडे, काका बाजारे, अंकुश कोतवाल, आनंद गायकवाड, उत्तम लोले, विपुल शितोळे, गणेश फरताळे यांनी निषेध व्यक्त केला.
ऱ्निषेधसभेनंतर पुणे-नगर महामार्गावर उपस्थित ग्रामस्थांनी 10 मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. रस्ता रोको दरम्यान खासदार शिवाजीर आढळराव पाटील यांनी उपस्थित राहून महापालिकेच्या निर्णयाचा विरोध दर्शविला. महापालिका विरोधी घोषणा देत नायब तहसीलदार सुनील शेळके यांना निवेदन देऊन रस्ता रोको स्थगित करण्यात आला. यावेळी पिंपरी सांडस, वाघोली परिसरातील ग्रामस्थांसह महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. दरम्यान, रस्ता रोकोसाठी केसनंद फाटा चौकात लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)