सत्ताधाऱ्यांभोवती “संशयकल्लोळ’

पिंपरी – लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. आमदार द्वयींमधील वाढता ताण, पदाधिकारी, नगरसेवकांमधील कलह, त्यातच वादग्रस्त निविदा प्रक्रिया, विनानिविदा ठराविक ठेकेदारांना दिली जाणारी मुदतवाढ, वाढीव खर्चाची कोटी-कोटी उड्डाणे यामुळे भाजप भोवती संशयाचे मळभ दाटले आहे. तापल्या तव्यावर पोळी भाजण्याची खेळी विरोधकांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला भूतो ना भविष्यती यश मिळाले. भाजप 78, राष्ट्रवादी 36, शिवसेना 9, मनसे 1 आणि अपक्ष 4 असे महापालिकेत संख्याबळ आहे. पाशवी बहुमत मिळालेल्या सर्वच विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. स्वीकृत सदस्य, क्षेत्रीय समिती स्वीकृत सदस्यांचेही बळ भाजपच्या पाठिशी आहे. मात्र, गटबाजीने पोखरल्याने बडा घर पोकळ वासा अशी भाजपची अवस्था सुरूवातीपासून पहायला मिळत आहे. निवडणुकीपूर्वी आणि सत्ता मिळाल्यानंतरही निष्ठावंत व आयाराम हा वाद इरेला पेटला. यातून कसाबसा समन्वय साधत पक्षश्रेष्ठींनी महापालिकेचा गाडा हाकायला सुरूवात केली. मात्र, वेळोवेळी हा वाद डोके वर काढतो. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष तथा आमदार जगताप यांना काम करताना कसरत करावी लागत आहे.

दुसरीकडे, आमदार महेश लांडगे सोयीच्या वेळी भाजप तर गैरसोयीच्या वेळी भाजपचे सहयोगी सदस्य अशी भूमिका घेतात. कोणावरही टीका न करता आपले काम चालू ठेवण्याचा पावित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या बाजूने विरोधकांना प्रत्युत्तर द्यायला ते कधीही समोर येत नाहीत. काही नगरसेवक विरोधी भूमिका घेत पक्षाला घरचा आहेर देवू लागले आहेत.

नुकतेच महापालिका सर्वसाधारण सभेत भोसरी येथील रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. बहुमताच्या जोरावर भाजपने हा प्रस्ताव दामटला असला तरी, पक्षाचे स्थानिक नगरसेवक रवि लांडगे यांनी जाहीरपणे रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध केला आहे. विशेष म्हणजे, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिला होता. तरीही पक्षाचेच नगरसेवक विरोधकांच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहे, ही खरी सत्ताधाऱ्यांची अडचण आहे.

तसेच, पदाधिकाऱ्यांमधील वर्चस्ववाद, नगरसेवकांमधील कुरबुरी मिटवताना भाजपची दमछाक होत आहे. विकास कामे, निविदा प्रक्रियांवरुन आमदार जगताप व लांडगे यांच्यातील तणाव वाढत आहे. त्यातून मागील दोन महिन्यात स्थायी समिती व महापालिका सभा तहकूब करण्यात आल्या. जगताप समर्थक, लांडगे समर्थक आणि निष्ठावंत अशा तीन गटांमध्ये शहर भाजपची विभागणी झाली आहे. त्यातून शहराचे पुणे-मुंबई महामार्गाच्या अलिकडे-पलिकडे अशी वाटणी झाल्याची टीका विरोधक करत आहेत. वरवर कितीही एकजुटीचे दर्शन घडविले जात असले, तरी आत एकमेकांचे पाय खेचण्याचे काम लांडगे-जगताप समर्थकांमध्ये सुरू आहे. त्याला तथाकथित निष्ठावंतांचा गट खतपाणी घालत असल्याने भाजपच्या कारभाराचे हसे झाले आहे.

वाढीव दराच्या निविदा प्रक्रियेमुळे संतपीठासारख्या प्रकल्पावर आरोपांचे शिंतोडे उडाले. फुटकळ कामांसाठीही सल्लागार नेमण्याचा पायंडा पडला आहे. कचरा निविदा प्रक्रियेवरुन भाजपवर आरोपांची राळ उडाली. भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या निर्णयाचीही त्यात भर पडली. भाजपच्या प्रत्येक निर्णयावर शंकेचे काहूर माजत आहे. त्यामुळे विरोधकांना स्फूरण चढले असून भाजपची कोंडी करण्याचा एकही संधी ते सोडत नाहीत. सत्ताधारी व विरोधकांच्या या राजकीय खेळ्यांमध्ये महापालिका कारभाराचा विचका होण्याची भीती शहरवासीय व्यक्त करत आहेत.

“ती’ खेळी भाजपला नाही जमली
शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळवून न देण्याची खेळी राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ता काळात केली होती. संख्याबळानुसार शिवसेनेची दावेदारी असतानाही अपक्षांची फौज कॉंग्रेसच्या दिमतीला पाठवून कॉंग्रेसला विरोधी बाकावर बसवले जायचे. एवढेच नव्हे तर महत्त्वाची पदे देखील कॉंग्रेसला दिली जात होती. परिणामी कॉंग्रेसची विरोधाची धार कमी झाली होती. मात्र, भाजपच्या सत्ताकाळात सारे काही आपल्यालाच या वृत्तीने काम चालू आहे. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूस असली तरी विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र येत असल्याने भाजपचा कारभार भरकटला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)