सत्ताधाऱ्यांपुढे प्रशासन नमले

अतिरिक्त आयुक्त उगले यांच्याकडील महत्त्वाचा पदभार काढला
पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून माजी अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या बदलीनंतर विद्यमान अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांच्याकडील प्रमुख खात्यांचा पदभार काढून तो अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने सर्व प्रकल्पांसाठी मान्यता आवश्‍यक असलेली तांत्रिक छाननी समिती अध्यक्षपद, अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, तसेच विद्युत विभागाचा समावेश आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपपुढे नमते घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी हे बदलाचे आदेश काढले असल्याने प्रशासकीय वर्तूळात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष बाब म्हणजे या पूर्वी माजी अतिरिक्‍त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडेही तांत्रिक छाननी समितीचे अध्यक्षपद होते.

सव्वा वर्षापूर्वी महापालिकेत ऐतिहासिक विजय संपादन केलेल्या सत्तारूढ भाजप आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये खटके उडत आहेत. शासनाकडून अतिरिक्त आयुक्त म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांकडून भाजप नगरसेवकांची कामे अडविली जातात अशी तक्रार करत या अधिकाऱ्यांवर थेट मुख्यसभेतच टिका केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रस्ताव तांत्रिक छाननी समितीमध्ये मंजूर न झाल्याने अनेक नगरसेवकांकडून पक्षाकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून जून महिन्याच्या मुख्यसभेत अनेक सदस्यांनी थेट उगले यांना टिकेचे लक्ष करत त्यांच्या बदलीची मागणी केली. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी उगले यांची बदली करावी यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली असून भाजपमधील जवळपास 75 नगरसेवकांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.

तसेच काही दिवसांपूर्वीच भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्‍तांची भेट घेऊन उगले यांच्याकडे असलेली खाती कमी करून ती निंबाळकर यांच्याकडे द्यावी यासाठी हट्ट धरला होता. त्यानुसार, महापालिकेत सर्वाधिक चर्चेच्या असलेल्या खात्यांचा पदभार उगले यांच्याकडून निंबाळकर यांच्याकडे देण्याचे आदेश आयुक्त राव यांनी गुरुवारी दुपारी काढले आहेत. दरम्यान, याबाबत महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हा प्रशासकीय निर्णय असून त्याबाबत बोलण्यास नकार दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)