सत्ताधाऱ्यांना सोईचे अंदाजपत्रक, विरोधकांची जोरदार टिका

पुणे – महापालिका स्थायी समिती अध्यक्षांनी मुख्यसभेला सादर केलेले अंदाजपत्रक हे पुणेकरांना “स्वप्न’ दाखवणारे आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष हे “सपनों के सौदागर’ आहेत आणि अंदाजपत्रक म्हणजे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांच्याच पोळीवर तूप वाढल्याची खरपूस टीका विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली.
स्थायी समितीच्या अंदाजपत्रकावर गुरूवारी पालिकेच्या खास सभेत चर्चा सुरू झाली. यावेळी विरोधकांनी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकाची चिरफाड करत जहरी टीका केली. तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी पुण्याला दिशा दाखविणारे अंदाजपत्रक अशा शब्दांत समर्थन केले. हे अंदाजपत्रक म्हणजे पुणेकरांच्या हाती पांढरी काठी देऊन वाटचाल करण्यास सांगितल्यासारखे आहे. केंद्र सरकारने आघाडी सरकारच्या काळातील योजनांना भाजपचा मुलामा लावून सुरू केल्या. तशाच योजना स्थायी समितीनेही सादर केल्या आहेत. अनेक योजना आधीच्या अध्यक्षांनी सुचवल्या असून, त्याचेच नाव बदलून नव्या योजना जाहीर केल्यासारखे दर्शवण्यात आल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी सभागृहनेते आणि स्वीकृत सदस्य सुभाष जगताप यांनी उदाहरणासह सांगितले.
मागील वर्षीपेक्षा 39 टक्के वाढ असणारे हे अंदाजपत्रक असून, महापालिकेच्या गेल्या 50 ते 60 वर्षांच्या इतिहासात एवढी मोठी तफावत असणारे अंदाजपत्रक कधीच सादर झाले नाही. पुणेकरांची शुद्ध फसवणूक करणारे हे अंदाजपत्रक असल्याची टीकाही जगताप यांनी केली. सन 2016-17 या वर्षामध्ये 3590 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये स्थायी समिती अध्यक्षांनी तब्बल 2322 कोटी रुपयांची वाढ केली आहे. अंदाजपत्रकामध्ये प्रशासकीय खर्चावर एकूण तीन हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. अंदाजपत्रकात 67 नव्या योजना मांडण्यात आल्या आहेत. मात्र, अंध, विधवा, अपंग यांच्या योजना गुल करून टाकल्या आहेत, असे सांगून जगताप यांनी बाबा आमटे विकलांग योजना, माता जिजाई आणि माता रमाई या योजनांची नावे सांगितली.
एखादा प्रकल्प जाहीर केल्यानंतर त्यासाठी 50 टक्के तरतूद करावी लागते. त्यानंतरच ती योजना जाहीर करता येते. अत्याधुनिक रुग्णालय बांधण्याची योजना जाहीर केली, मात्र त्यासाठी केवळ पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जगताप म्हणाले. मेट्रोच्या तरतुदीवरही जगताप यांनी शंका उपस्थित केली. अंदाजपत्रक म्हणजे बेरजेचा खेळ असल्याची टीका कॉंग्रेसच्या सदस्यांनी केली. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे मागणी करूनही अंदाजपत्रकात बदल करण्यासाठी स्थायी समितीचे ठराव दिलेले नाहीत. करदात्यांना दोन टक्के शास्तीकर लावून 130 कोटी वसूल केले जात आहेत, तर बांधकाम व्यावसायिकांना अभय योजना दिली जात आहे. पथारीवाल्यांकडून दंडापोटी 95 कोटी वसूल केले जात आहेत. अनेक योजनांसाठी अल्प तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात खर्च आणि जमेचा ताळमेळ नाही, असा टोलाही कॉंग्रेसने लगावला.
स्मिता कोंढरे, बाबुराव चांदेरे, हमीदा सुंडके, अमृता बाबर, अश्विनी भागवत, वनराज आंदेकर, योगेश ससाणे यांनी अंदाजपत्रकात सत्ताधारी सभासदांसाठी अधिक तरतूद आणि विरोधी पक्षांच्या सभासदांसाठी अल्प तरतूद केल्याबद्दल निषेध व्यक्त केला. तर अजय खेडकर, राणी भोसले, गोपाळ चिंतल यांनी वास्तववादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्षांचे अभिनंदन केले.

महापालिकेचा बोर्ड पुन्हा लावा – जगताप यांचे आव्हान
नर्सिंग कॉलेज बांधण्याविषयीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. मित्रमंडळ चौकातील नऊ एकर जागा गेल्या 42 वर्षांपासून नर्सिंग कॉलेजसाठी राखीव आहे. त्या जागेवर कालपर्यंत महापालिकेचा बोर्ड होता. मात्र आता “पुण्याच्या कारभाऱ्यां’चा बोर्ड लागला आहे. तो बोर्ड काढून दाखवण्याची हिंमत दाखवा, असे आव्हानही सुभाष जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. हे “कारभारी’ कोण हे नाव सूज्ञास सांगणे न लगे.

तर आमदारांना शांत बसू देऊ नका.
आघाडीचे सरकार असताना पुण्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एकच आमदार निवडून गेला होता. असे असतानाही तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यासाठी पाच वर्षांत 1283 कोटी रुपये अनुदान दिले. आता पुण्याने आठ आमदार आणि एक खासदार निवडून दिला आहे, असे असताना तीन वर्षांत केवल 443 कोटी रुपये अनुदान महापालिकेला मिळाले आहे. पुण्याचा विकास करायचा असेल तर या आमदार आणि खासदारांना स्वस्थ बसू देऊ नका, अनुदानासाठी सतत त्यांच्या मागे लागा, असा सल्लाही सुभाष जगताप यांनी दिला.

एखाद्याचे नाव राहिले असल्यास कचरा डेपोला नाव द्या
कचरा डेपोचा प्रश्‍न मार्गी न लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले. कोणत्या नेत्यांची नावे द्यायची राहिली असल्यास कचरा डेपोला नाव द्या, पण कचारा डेपो सुरू करा, असे म्हणत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले. त्यामुळे काही वेळ शाब्दिक चकमकी उडाल्या.

“गो.चिं’नी पाऊणतासांच्या भाषणातून केली सत्ताधाऱ्यांची “गोची’
भाजपचे स्वीकृत सदस्य गोपाळ चिंतल यांनी सभागृहामध्ये सर्वच नगरसेवकांची भाषणे ऐकूण दुपारी सव्वाचारच्या सुमारास भाषणाला सुरूवात केली. आपला राजकीय अनुभव आणि अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी काश्‍मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्व घटनांचा आढावा घेतला. भाजपच्या संघर्षाची आणि नेत्यांची उदाहरणे त्यांनी आपल्या भाषणात दिली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या आरोपांना आणि टीकेला त्यांनी आपल्या खास शैलीतून उत्तर दिले. सुमारे पाऊणतास सर्वच नगरसेवकांनी त्यांचे भाषण काळजीपूर्वक ऐकले. कोणीही त्यांच्या भाषणामध्ये व्यत्यय आणू नये यासाठी विरोधकांनी सुध्दा काळजी घेतली. शेवटी पाऊणतास भाषण झाल्यानंतर नगरसेवकांनी “आता अंदाजपत्रकावर बोला, त्यावर बोलायचे राहूनच गेले’ अशी मागणी चिंतलांकडे केली. त्यांच्या भाषणाच्या स्पीडमुळे कोणीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे या “गो.चिं’नी संपूर्ण सभागृहाची “गोची’ करून टाकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)