सत्ताधाऱ्यांना संत परंपरेचा विसर

पिंपरी – आषाढी वारीतील दिंड्यांना महापालिकेच्या वतीने भेटवस्तू देण्याची अनेक वर्षांची परंपरा यंदा खंडीत होणार असल्याने विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आहे. ही परंपरा खंडीत करणारा सत्ताधारी भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. तर जबाबदारी सांभाळण्यात अपयशी ठरलेले भाजपच्या हातातील खेळणं झालेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राज्य सरकारकडे आपल्या बदलीची मागणी करत आपला गाशा गुंडाळावा. तसेच आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना देखील संत परंपरा व आपल्या घराण्याच्या वारसाचा विसर पडला आहे, अशी जहरी टीका केली आहे.

गेली अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील सहभागी दिंड्यांना भेटवस्तू दिली जाते. मात्र गेली दोन वर्षांपासून या भेटवस्तुंची खरेदी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मात्र, यंदा देखील ही परंपरा सुरु रहावी, याकरिता सत्ताधारी भाजप व प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. याकरिता पालखी सोहळ्यातील मान्यवर, महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक महिनाभरापूर्वी महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्याबाबत सकारात्मक भुमिका घेतली होती. या बैठकीला उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीच दिंड्यांना यंदा भेटवस्तू म्हणून तंबू देण्याचे सुचविले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आर्थिक भुर्दंड सहन करुन, अन्य संस्था, संघटनांना भेटवस्तू देण्यास मनाई करण्यात आल्याची बाब महापालिका अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे भेटवस्तु देण्याबाबत आयुक्तांनी “यू टर्न’ घेतला. मात्र, महापौर नितीन काळजे मात्र, भेटवस्तू देण्याबाबत आग्रही होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत, भेटवस्तू देण्याची कार्यवाही आपल्या पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. मात्र, महापालिका प्रशासनाला ही तांत्रिक बाब अडचणीची वाटल्याने, प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

आता आषाढी वारीसाठी अवघा आठवडाभराचा अवधी बाकी राहिला आहे. या पार्श्‍वभूमीवर दत्ता साने म्हणाले की, दिंड्यांना भेटवस्तु देण्याची महापालिकेची परंपरा आहे. मात्र, भाजपचे नास्तिक पदाधिकारी या नियोजित भेटवस्तू खरेदीमध्ये फारसे “काही’ मिळणार नसल्यानेच ही खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र या भेटवस्तू खरेदीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सर्व नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याची तयारी आहे. भाजपने देखील अशी तयारी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

…अन्यथा “टाळ कुटो आंदोलन ‘
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंडी प्रमुखांनी आजपर्यंत कोणत्याही भेटवस्तुची अपेक्षा केलेली नाही. मात्र, महिनाभरापूर्वी पालखी सोहळा नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये भेटवस्तू देण्याची महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयारी दर्शविली होती. मात्र, आता प्रशासन आणि भाजप मागे सरकत आहे. ही भेटवस्तू न दिल्यास वारकऱ्यांसोबत आयुक्त व महापौर दालनासमोर टाळकुटो आंदोलन करु. प्रसंगी हे टाळ त्यांच्या डोक्‍यात घालायला मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मौजमजेसाठी प्रशिक्षणाचा बहाणा
महापालिकेचे सर्व अधिकारी निवासी प्रशिक्षणासाठी शुक्रवारी सायंकाळी रवाना झाले. मात्र, पावसाळ्याचे दिवस असताना, शहरात कोणत्याही क्षणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी एकही जबाबदार अधिकारी मुख्यालयात नसल्यास याची जबाबदारी कोणाची ? असा सवाल करत, आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हे सर्व अधिकारी मौजमजा करायलाच मुळशीत गेले असल्याच आरोप साने यांनी केला आहे. तसेच, भारतीय प्रशासकीय सेवेतील महापालिका आयुक्त व वर्ग एक, दोनच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची एवढीच गरज होती, तर ऑटो क्‍लस्टरसारख्या ठिकाणी देखील हे नियोजन करता आले असते, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)