सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी मातब्बरांचा शड्डू

मलकापूर निवडणूक चिन्हावर की स्थानिक आघाड्यांवर

उमेश सुतार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड – सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मलकापूर नगरपरिषदेचा बिगुल वाजल्यामुळे सत्ताधाऱ्यांसह त्यांना शह देण्यासाठी इतर राजकीय पक्षांतील मातब्बरांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे मलकापूरचा राजकीय आखाडा हळूहळू तापू लागला आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाल्याने आपलाच नगराध्यक्ष कसा होईल, याची अंतर्गत व्युहरचना सुरु झाली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपाचा गट पूर्ण ताकदीनिशी उतरला असल्याने ही निवडणूक चिन्हावर होणार की स्थानिक आघाड्यांवर? याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

मलकापूर नगरपंचायतीला 24 सप्टेंबर 2018 रोजी क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने मलकापूरात राजकीय हालचालींनी वेग घेतला. मलकापूर नगरपरिषदेसाठी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवड होणार असल्याने सातारा जिल्ह्यात याबाबत कमालीची उत्सुकता आहे. एकूण 19 जागांसाठी होणारी ही निवडणूक यावेळी चांगलीच रंगणार असून बाजी मारण्यासाठी निवडणुक रिंगणात उभे राहणाऱ्यांचे पुढील भवितव्य सुमारे 18 हजारांपेक्षा जास्त मतदार ठरविणार आहेत.

मलकापूर नगरपंचायतीचा कारभार सन 2009 पासून कॉंग्रेसकडे एकहातीच आहे. याची धुरा कॉंगेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांचेच खांद्यावर आहे. त्यांनीही ती समर्थपणे पेलत शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात असतानाच मनोहर शिंदे यांनी नगरपंचायतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून नगरपंचायतीची स्थापना केली.

तर 2008 मध्ये नगरपंचायत स्थापन करीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून शहरात विविध विकास योजना मार्गी लावल्या आहेत. यावेळी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली.
यावेळी विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांचा गट शिंदेभाऊंच्या विरोधात होता. 2008 ते 2013 या पाच वर्षातील कालावधीत मनोहर शिंदे यांनी शहरात भरीव विकासकामे केली. यामुळे 2013 च्या निवडणुकीत मनोहर शिंदे गट, डॉ. अतुल भोसले गट व आ. बाळासाहेब पाटील यांचा गट एकत्र आले होते. यावेळी यांच्या विरोधात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाने सामना केला. मात्र यावेळी 17-0 अशी बाजी मारत मनोहर शिंदे गटाने आपले वर्चस्व सिध्द करुन दाखवले.

विधानसभा 2014 च्या निवडणुकीमध्ये डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात निवडणूक लढविली. त्यापासून भोसले गट व चव्हाण गटात दरी निर्माण झाली. या निवडणुकीत मात्र मनोहर शिंदे यांच्याविरोधात डॉ. अतुल भोसले यांनीच दंड थोपटले आहे. यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. कॉंग्रेसकडून आ. पृथ्वीराज चव्हाण तर भाजपाकडून ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मलकापूर भेटी व सभांमुळे राजकीय वातावरणात चांगलीच रंगत आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)