सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळून लावा : अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे – “आपल्याविरोधात वारे असल्याचे समजल्यानेच या सरकारने आता अयोध्येचा प्रश्‍न निर्माण केला आहे. यानिमित्ताने देशात दंगली घडवून भीतीयुक्‍त वातावरण निर्माण करायचे आणि निवडणूक जिंकायची, हे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे त्यांचे हे मनसुबे आपल्याला हाणून पाडायचे आहेत,’ अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे टीका केली.

संविधान दिनानिमित्त सोमवारी वंचित बहुजन आघाडीने संविधान सन्मान सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह आघाडीतील नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली.

“सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत आहे आणि चिंतेने ग्रासलेला माणूस काहीही करू शकतो. त्यामुळेच त्यांनी अयोध्येचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यातून धार्मिक दंगली घडवायच्या आणि देशातील वातावरण बिघडवायचे, असा प्रयत्न सुरू आहे, नाहीतर दुसरा प्रयत्न म्हणजे पाकिस्तानबरोबर युद्ध करायचे. या दोन गोष्टींशिवाय आपल्याला सत्ता मिळणार नाही, हे आता मोदी यांनी जाणले आहे. त्यामुळेच आपल्याला आगामी काळात खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहिले पाहिजे,’ असेही आंबेडकर म्हणाले.

कॉंग्रेससोबत आम्ही समझोता करायला तयार आहोत, पण ते तयार होत नाहीत. आम्ही बारा जागा मागितल्या आहेत. इतक्‍या जागा द्यायला ते तयार नाहीत. एमआयएमला सोबत घेऊ नका, असे सांगतात. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपचे साटेलोट आहे, असेच आम्हाला वाटते आहे. त्यामुळे आम्ही सर्व वंचितांना एकत्र करुन नवीन पर्वाची सुरूवात करणार आहोत. वंचितांची ही आघाडी याची सत्तेतील मक्‍तेदारी उतरविल्याशिवाय राहणार नाही

इतके वर्ष मुस्लिमांना मुस्लिमांनीच हरविले आहे, त्याच प्रमाणे दलितांना दलितांनीच हरविले आहे. आपल्या बाहेरच्या शत्रूंपेक्षा आपल्यातील विरोधकांना एकत्र आणून पुढे गेले तर नक्कीच फायदा होणार आहे. गेले सत्तर वर्षे आम्ही गप्प होतो आणि तुम्ही बोलत होता. आता मात्र परिवर्तन झाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकत राहायचे आहे, असे इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)