सत्ताधाऱ्यांची विचारसरणी देशाला घातक

सीबीआय प्रकरणावरून शरद पवार यांची भाजपवर टीका

पुणे – सर्वोच्च तपास यंत्रणा असणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) प्रमुखाला रातोरात घरी पाठवून ज्याच्या विरोधात अनेक चौकशा केल्या, अशा व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च तपासयंत्रणेचा प्रमुख करण्यात आले. हे देशाच्या दृष्टीने अतिशय घातक असून या सरकारचा संविधानावर विश्‍वास राहिलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी भाजपवर केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे आयोजित “मिशन संविधान बचाओ, देश बचाओ’ या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. त्याला पवार उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, राष्ट्रवादी नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण, विद्या चव्हाण, सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले, आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील एका मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी निर्णय दिला आहे. महिलांचा अधिकार त्यांना मिळाल्यामुळे याची अंमलबजावणी केरळ सरकारने सुरू केली. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष न्यायालयाच्या निर्णयावरच आक्षेप घेतात; याचाच अर्थ असा, की त्यांना स्त्री- पुरुष समानता मान्य नाही. घटनेवर, न्यायवेवस्थेवर त्यांचा विश्‍वास नाही. अशी विचारसरणी देशाच्या लोकशाहीला हे मारक असल्याचे पवार म्हणाले.

राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. नागरिकांना दुष्काळाच्या झळा पोहोचत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम महिलांना सोसावा लागत आहे. आघाडी सरकारच्या काळात लाखो जनावरांसाठी चारा छावण्या तयार करण्यात आल्या होत्या. आम्ही चारा छावण्या तयार करणार नाही, तर चारा लावणार असल्याची घोषणा सध्याच्या सरकारकडून करण्यात आली आहे. दुष्काळातील उपाययोजनाच या सरकारला माहित नाही. यांना दुष्काळाचे गांभीर्यच लक्षात येत नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले. संविधानाच्या संरक्षणासाठी देशभर हे अभियान राबवत असल्याचे पवार यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. देशातील सत्ताधाऱ्यांना घटना बदलून त्यांच्या सोयीची घटना तयार करावयाची असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

मनुस्मृती आणि इव्हीएमचे दहन
“संविधान बचाओ, देश बचाओ’ अभियानाच्या सांगता सभेनंतर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लोकशाहीला आणि संविधानाला घातक ठरणाऱ्या प्रतिकात्मक इव्हीएम मशिनचे आणि मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)