सण-उत्सवांचे संगमनेर

संग्रहित छायाचित्र

निजामशाही, शिवकाल, पेशवाई अनुभवलेल्या आणि स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या संगमनेरचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. इ.स. पूर्व सुमारे 200 वर्षांपूर्वी प्रवरेच्या काठावर मानवी वस्ती निर्माण झाल्यानंतर संगमनेर हे गाव उदयाला आले. चार लहान-मोठ्या नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगमनेरला ऐतिहासिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीप्रमाणेच धार्मिक पार्श्वभूमी लाभली आहे. सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने संगमनेरात नांदत असतानाच येथे सर्वधर्मिय उत्सव आणि सणांची परंपरादेखील लाभली आहे. प्रवरा खोऱ्यातील आजच्या संगमनेरचा परिसर हा दंडकारण्याचा एक भाग म्हणून ओळखला जातो. रामायणातील राम, सीता आणि लक्ष्मणाच्या सान्निध्याने येथील धार्मिकता उजळून निघाली आहे.

जुन्या काळातील एक छोटेसे टुमदार गाव अशी संगमनेरची ओळख आज विकसित संगमनेर अशी झाली असताना या गावात समाज व्यवस्थेनिहाय गल्ल्या, देव-देवतांची समाजनिहाय मंदिरे आणि त्या समाजनिहाय मंदिरांतून वर्षानुवर्षे साजरे होणारे धार्मिक उत्सव संगमनेरची ओळख अधोरेखित करतात. या धार्मिक उत्सवांसोबतच संगमनेरात अनेक उपक्रमातून सामाजिक एकोपा जोपासला जातो. शहर आणि उपनगरातून भल्या पहाटे परमेश्वराचा नामजप करणारी प्रभातफेरी असो, की भगवद्‌गीतेच्या विचारांचे बालकांवर संस्कार करणारा गीता परिवार यातून धार्मिकता जोपासली जात आहे. शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सय्यदबाबा ऊरुस, हनुमान जयंतीची मिरवणूक, मोहरमची मिरवणूक, सवाऱ्या, चर्चमधून साजरा केला जाणारा नाताळचा उत्सव यातून संगमनेरकरांच्या धार्मिकतेचा परिचय होतो.

संगमनेरमध्ये फार पूर्वीपासून हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती रथाची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीचा इतिहासदेखील रंजक आहे. 1927 ते 1929 असे सलग तीन वर्षे ब्रिटिशांनी या मिरवणुकीवर बंदी घातली. बंदी आदेश मोडत संगमनेरकरांनी अडविलेल्या रथाची पहिल्या वर्षी पाच दिवसानंतर, दुसऱ्या वर्षी दोन महिने रोज पूजा-अर्चा करत मिरवणूक काढली. सलग दोन वर्षे झालेल्या वादाची परिणती तिसऱ्या वर्षीदेखील कायम होती. 23 एप्रिल 1929 रोजीच्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आधीच बैठका घेत लोकभावना भडकावण्याचा प्रयत्न केला. पोलीस मिरवणुकीत आडकाठी आणणार हे स्पष्टच होते.

मिरवणुकीच्या आदल्या दिवशी मिरवणुकीला बंदी जाहीर करण्यात आली. संगमनेरला पोलीस छावणीचे स्वरूप आले. प्रमुख मंडळींना नोटिसा बजावल्या गेल्या. पहाटेच्या सुमारास मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. याही परिस्थितीत मंदिरातील विधी उत्साहात पार पडले. सकाळचे नऊ वाजले. काही मुलांनी पळत येत हनुमानाची मूर्ती रथावर ठेवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मूर्ती ताब्यात घेतली. मुलांच्याच हाताने मूर्ती पुन्हा मंदिरात नेण्यात आली.

दुपारचे ऊन वाढत असताना अचानक दोनशे-सव्वादोनशे स्त्रियांनी येत रथाचा ताबा घेतला. ही माहिती गावभर गेल्याने महिलांची संख्यादेखील पाचशेच्यावर गेली. पोलिसांनी बायकांसोबत युक्तिवाद करण्याचे प्रयत्न केले. अटक करण्याची, खटले भरण्याची धमकी दिली. मात्र, या स्त्रियांनी त्यांना ठणकावत हा उत्सव गावचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे एका तरुणाला बेड्या घालत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गडबड वाढली. पोलीस अधिकारी त्या दिशेने धावले आणि दुसरीकडे संधीचा फायदा घेत झुंबरबाई शिंपी ही महिला मारुतीची तसबीर घेऊन चपळाईने रथावर चढली.

तिच्यासोबत आणखी काही महिला रथावर चढल्या आणि हनुमानाचा जयघोष करत उपस्थित स्त्रियांनी रथ ओढत रंगारगल्लीतल्या संत वाड्यापर्यंत आणला. पोलिसांची धावपळ उडाली. त्यांनी बैलगाड्या, अधिकाऱ्यांच्या मोटारी भडंगबाबा मशिदीपुढे आडव्या लावल्या. शस्त्रधारी पोलिसांची तुकडी लावली गेली. मात्र, याला न जुमानता महिलांनी रथ तेथून पुढे नेलाच आणि पोलिसांचा विरोध मोडून पडला. महिलांनी केलेल्या या कार्याची दखल संगमनेरच्या इतिहासाने घेतली. त्यामुळे आजही रथाच्या मिरवणुकीची पूजा पोलीस अधिकाऱ्याच्या हस्ते केली जाते आणि महिलांच्या हस्ते रथ ओढण्याचा मानदेखील दिला जातो.

संगमनेर शहर आणि उपनगरातून परमेश्वराचे नामस्मरण करणारी भजने म्हणत भल्या पहाटे गेल्या काही वर्षांपासून प्रभातफेरी निघते. गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांच्या पुढाकारातून निघणारी ही प्रभातफेरी देखील संगमनेरचे वैशिष्ट्य बनले आहे. राधाकृष्णजी महाराज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील उद्योजक राजेंद्र सोमाणी यांच्या माध्यमातून संगमनेरात आले. कार्यक्रमस्थळी त्यांनी प्रभातफेरीची कल्पना मांडली आणि महाराजांच्या शब्दाची परिणती प्रभातफेरीत झाली. आजही राधाकृष्ण महाराज संगमनेरात आले की या प्रभातफेरीला आवर्जून हजेरी लावतात. या फेरीच्या माध्यमातून सर्वधर्मीय लोक आपसात जोडले गेले असून, त्यांचे एक कुटुंबच तयार झाले आहे.

शिवजयंती उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. शासकीय आणि तिथीनुसार असा वाद येथे देखील कायम असला तरी संगमनेरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी काही वर्षांपूर्वी एकत्र येत शिवजयंती उत्सव समितीची स्थापना केली. या उत्सव समितीच्या माध्यमातून शिवजयंतीची भव्य मिरवणूक शहरातून काढली जाते. उत्सव समितीत ज्येष्ठांसोबतच तरुणांची संख्या मोठी आहे. अमोल कवडे या तरुणाच्या खांद्यावर गेल्या वर्षीपासून उत्सव समितीच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. बालकांच्या मनावर भगवद्‌गीतेच्या माध्यमातून संस्काराचे बीजारोपण करण्याचे काम गीता परिवाराच्या माध्यमातून संगमनेरात 30 वर्षांपासून सुरू आहे. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी गीता परिवाराचा विस्तार देशभर नेला आहे. देशाच्या अनेक राज्यात आज गीता परिवाराचे काम सुरू आहे.

संस्काराची गंगोत्री असलेल्या या गीता परिवाराने आतापर्यंत अनेक पुस्तकांची निर्मिती केली. गीता परिवाराची शिबिरे मुलांसाठी वाटाड्याचे काम करत आहे. मुस्लीमच नव्हे तर हिंदू धर्मियांसाठी देखील महत्त्वाचा असलेला येथील सय्यदबाबाचा उरूस. संगमनेरातील सर्व समाजाचा सहभाग असलेला हा उरूस गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही दिवसांपासून सय्यदबाबा उरूस समितीच्या माध्यमातून या उरुसाला वेगळेपण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजातील विविध घटकांचा सहभाग या समितीत असतो. याशिवाय मोहरमची मिरवणूकदेखील मोठी निघत असते. संगमनेरमधील मुस्लीम बांधवांचा सहभाग असलेली ही मिरवणूक शहराच्या विविध मार्गावरून जात असताना त्यात अनेकजण सहभागी होत असतात.

साडेतीन शक्तीपीठातील अर्धे शक्तीपीठ म्हणून ज्या वणीच्या देवीची ओळख आहे त्या देवीच्या नावाने संगमनेरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत शनिमंदिरापासून दररोज माळेची मिरवणूक निघत असते. ही मिरवणूक देवीगल्लीतील देवीच्या मंदिरात जाते. माळेची मिरवणूक ही देखील संगमनेरकरांच्या धार्मिकतेची ओळख ठरली आहे. संगमनेरमध्ये गणेशोत्सवदेखील मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
शहरात विविध गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध देखावे आयोजित करत असतात. देखावे पाहण्यासाठी संगमनेरकरांची मोठी गर्दी होते. गणेशोत्सव उत्सवाचा हा कालखंड उत्साह वाढविणारा ठरतो. सर्व गणेश मंडळे आणि मालपाणी उद्योगसमूह, राजस्थान युवक मंडळाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून संगमनेर फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. यातून सामाजिक प्रबोधनाला वाव मिळत असतो. याशिवाय श्रावणात निझर्णेश्वर, बाळेश्वर, खांडगाव येथील देवस्थानात भाविक श्रध्देने पूजा अर्चा करतात. विविध धर्मीय त्यांच्या धर्मगुरुंचे उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करतात.

नितीन शेळके 

संगमनेर प्रतिनिधी  


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
13 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)