सणांचा देश, भारत : एक अनुभव

मी आणि माझे पती गेली अडीच वर्षे पुण्यात स्थायिक आहोत आणि नुकताच, म्हणजे जूनमध्ये आमच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. इथे राहताना आम्हाला सर्वात जी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट वाटली ती म्हणजे इथे असलेली सणांची आणि उत्सवांची रेलचेल. अगदी लहानसहान सोहळ्यांपासून ते दिवाळी आणि गणपती या प्रमुख सणांपर्यंत.

इथल्या सणांविषयी, संस्कृतीविषयी सणांच्या सोपस्कारांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही या सणांमध्ये शक्‍य तेव्हा भाग घ्यायचा प्रयत्न केला. गणपतीउत्सवादरम्यान आयोजित केल्या गेलेल्या दोन पदयात्रांमध्ये सामील होऊन आम्ही काही मोठमोठ्या मंडपांमधील तसेच काही लहान मंडपांमधील उत्सव आणि मिरवणुका पहिल्या. या उत्सवांमध्ये दिसणारी श्रद्धा, भक्ती आणि एखाद्या जत्रेत असावे तसे वातावरण पाहणे खूप आनंददायी होते. प्रत्येक वेळी काहीतरी नवा अनुभव मिळत गेला आणि हा उत्सव पुण्यात इतका का लोकप्रिय आहे याविषयी आम्हाला अंदाज येत गेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी मात्र आम्ही पुण्याबाहेर होतो आणि या निमित्ताने हाच सण इतर ठिकाणी कसा साजरा केला जातो हे बघण्याची संधी मिळाली.

पिंपरी निलख येथे ज्या सोसायटीत आम्ही राहतो ती सोसायटी सणसमारंभ खूप उत्साहाने साजरी करते. अगदी दिवाळीच्या खरेदीपासून ते गणपतीच्या मिरवणुकीपर्यंत सगळे क्षण आणि होळीची रंगीबेरंगी मजा, अगदी सर्वकाही! सगळ्यांच्यात मिसळणं, नव्या शेजाऱ्यांना भेटणं आणि सणांचं सांस्कृतिक महत्त्व समजून घेणं याची मजा आम्ही पुरेपूर लुटली.
दुर्दैवाने या वर्षी आम्ही दिवाळीत इथे नसू कारण आम्ही तेव्हा प्रवासात असू, पण काही खास लज्जतदार मिठाया आमच्याबरोबर नक्कीच असतील, ज्या मी मित्रमंडळी, परिवार आणि सोसायटीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नेहेमी खरेदी करत असते.

पुण्यातल्या आमच्या पहिल्या वर्षातली ही गोष्ट आहे. आम्ही एकदा रात्रीचे जेवण करून घरी परत येत असताना आम्हाला एक स्त्रियांचा समूह एका चौकात नाचताना दिसला. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की हा नवरात्रीचा उत्सव आहे आणि या नाचाला दांडिया म्हणतात. तो नाच पाहायला आम्ही थोडा वेळ थांबलो. पाच मिनिटातच आम्हाला नाचात सहभागी व्हायचं आमंत्रण आलं. कसं नाचायचं याची थोडी माहिती आम्हाला देण्यात आली. अत्यंत अवघडल्यासारखं वाटत होतं पण त्याचबरोबरएक आपलेपण देखील जाणवत होतं. इंग्लंडमध्ये जे आयुष्य आम्ही जगतो त्याहून वेगळं काहीतरी अनुभवल्याचा आनंद आम्हाला मिळाला.

भारतातल्या सणसमारंभात मला जाणवलेली सर्वात कुतूहलाची गोष्ट म्हणजे देशाच्या विविध भागांमध्ये असलेले विविध सणांचे महत्त्व. होळीसाठी आम्हाला राजस्थानला जायचा सल्ला मिळाला, जेथे होळी पुण्याहून जास्त उत्साहाने साजरी होते, तर गणेशोत्सवासाठी पुण्याहून उत्तम कुठलीही जागा नाही. शिवाय देशोदेशीच्या, विविध धर्माच्या पाहुण्यांचं स्वागत इथे ज्या आपुलकीने केलं जातं आणि इथल्या सणांची माहिती ज्या उत्साहाने दिली जाते ते विस्मयकारक आहे. ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीची कोंडी या त्रासदायक गोष्टी वगळल्या तर इथले सणसोहळे येथील लोकांच्या उत्साहासाठी, प्रेमासाठी आणि संगीतासाठी अवश्‍य अनुभवले पाहिजेत.

– हेझल गियरी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)