सणसवाडी कलाकेंद्रात गाणी लावण्याच्या वादातून मारहाण

हॉकी, बाटली व बांबूने मारहाण करीत रिव्हॉल्वरच्या धाकाने सोळा हजार लुटले
शिक्रापूर  -सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका कलाकेंद्रात संगीत बारीमध्ये गाणी लावण्याच्या पैशांच्या वादातून झालेल्या भांडणातून एकास हॉकी, बांबू तसेच काचेच्या बाटलीने मारहाण करीत रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याच्या खिशातील सोळा हजार रुपये काढून घेतले असल्याचा प्रकार सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात सहा जणांवर दरोडा, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन कुंजीर व त्यांचे साथीदार किरण मेमाणे, अजित गायकवाड, सतीश वाघमारे हे सणसवाडी येथील अंबिका लोकनाट्य कला केंद्र या ठिकाणी संगीत पार्टीसाठी आलेले होते. येथे थिएटरमध्ये संगीत बारी लावत असताना त्यांनी प्रथम एका पार्टीत सहभाग घेतला आणि त्याचे पैसे देऊन त्यानंतर ते सर्वजण दारू प्यायले. त्यानंतर पुन्हा त्यांनी दुसऱ्या संगीत पार्टीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पार्टीचे चार हजार रुपये दिले असताना देखील रिंकू नावाचा एक जण त्यांच्याकडे आला व अजून नऊ हजार रुपये द्या, असे म्हणाला. यावेळी त्याने “आधीच पैसे आम्ही दिलेले आहेत, मग आता जास्त कसे काय द्यायचे’ असे विचारले असता, त्याने “तुम्हाला पैसे द्यावे लागतील नाहीतर गोळ्या घालील’ असा दम दिला. तेव्हा कुंजीर व त्यांचे साथीदार “आता आम्हाला येथे थांबायचे नाही’ असे म्हणून बाहेर निघाले. यावेळी कुंजीर हे पार्किंगमधून त्यांची गाडी काढत असताना कोणीतरी त्यांच्या डोक्‍यात हॉकीने मारले. यावेळी त्यांनी मागे पाहिले असताना पुन्हा त्यांच्या डोक्‍यात पुढून मारले आणि अचानक पाच ते सहा जणी मिळून बांबूची काठी, दांडकी घेऊन येत कुंजीर यांना मारहाण केली तर एकाने हातातील काचेची बाटली कुंजीर यांच्या छातीत मारली व एक इसमाने रिव्हाल्वर घेऊन कुंजीर यांच्यावर उगारले. यावेळी कुंजीर हे मारण्याच्या भीतीने जागेवर उभे राहिले तेव्हा येथील काही जणांनी कुंजीर यांचे साथीदार किरण मेमाणे, अजित गायकवाड, सतीश वाघमारे यांना देखील मारहाण केली. यावेळी कुंजीर हे खाली पडले तेव्हा येथील एकाने त्यांच्या खिशातील सोळा हजार रुपये काढून घेतले. यावेळी कुंजीर यांनी त्यांच्या पैशाची मागणी केली असता रिंकू याने कुंजीर यांना “तू रूममध्ये ये तुझा मर्डर करतो’ अशी धमकी दिली असल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर भयभीत झालेले कुंजीर यांनी रस्त्याचे गाडीला हात करत जखमी अवस्थेत शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले व याबाबत नितीन दत्तात्रय कुंजीर (रा. थेऊर ता. हवेली)यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी रिंकू, तसेच पवार (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) तसेच इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)