शिक्रापूर- सणसवाडी येथील अंबिका कलाकेंद्र येथे कार्यक्रम पाहण्यासाठी कुंजीरवाडी येथून आलेल्या एकावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून चार वर्षापूर्वी झालेल्या वादातून तिघांनी एकाला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि.24) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भरत हौसिराम निगडे (रा. कुंजीरवाडी निगडीवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी राहुल हरपळे (रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) तसेच दोन अनोळखींवर खुनाचा प्रयत्न तसेच शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील भरत निगडे आणि राहुल हरपळे यांच्यात चार वर्षापूर्वी ग्रामपंचायतच्या राजकीय कारणावतून वाद झाला होता. त्यावेळी राहूल हरपळे आणि त्याच्या साथीदारांनी भरत आणि त्याच्या भावावर हल्ला केला होता. तेव्हा भरत याने लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तेव्हापासून हरपळे हा भरतसोबत रागाने आणि अपखुशीने वागत होता. तर शुक्रवारी (दि.24) भरत निगडे आणि त्याचा मित्र स्वप्नील गाढवे हे दोघेजण सणसवाडी येथील अंबिका कलाकेंद्र येथे कार्यक्रम पाहण्यासाठी आले. तेथील खुर्चीवर बसलेले असताना रात्री पावणे बाराच्या सुमारास राहुल हरपळे आणि त्याचे दोन मित्र भरत जवळ आले. राहुल याने भरतला “तुला लई माज आला आहे. तुला गोळ्या घालून संपवून टाकतो’ असे म्हणत त्याच्या अंगावर धाऊन येऊन भरतवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केला. त्यावेळी भरत खाली पडला असताना राहुलच्या साथीदारांनी भरतला लाथाबुक्‍य्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी भरत सोबत आलेला त्याचा मित्र स्वप्नील याने त्यावेळी सोडवासोडव केली. तेव्हा तेथील नागरिक आणि कलाकेंद्रातील महिला गोळा झाल्याने राहुल तसेच त्याचे साथीदार पळून गेले. त्यांनतर जखमी भरत आणि त्याचा मित्र स्वप्नील यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)