सणसवाडीत किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे दोन गटात वाहन आडवे लावल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 7 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून चौघांवर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. यात प्रकाश ऊर्फ काका दशरथ शेलार (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) आणि योगेश दरेकर (रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शरद दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत दरेकर हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून जात असताना शेजारून जात असलेल्या (एमएच 16 जीटी 3021) या वाहनाने ब्रेक मारल्याने दरेकर यांनी त्यांची दुचाकी थांबविली. त्यावेळी वाहनावरील चालक प्रकाश शेलार याने दरेकर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने वाहनातून खाली उतरून दरेकर यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच वाहनातील दांडके काढून दरेकर यांना मारहाण करू लागला. त्याचवेळी शेलार याने फोन करून बोलाविलेल्या दोन अनोळखी व्यक्‍तींनी देखील दरेकर यास शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. यावेळी तेथे असलेल्या अविनाश हुगे यांनी त्यांची भांडणे सोडविली. याबाबत योगेश दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्रापूर पोलिसांनी प्रकाश दशरथ शेलार (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) तसेच दोन अनोळखी व्यक्‍तींवर मारहाण, शिवीगाळ दमदाटीप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
तर, प्रकाश ऊर्फ काका शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, शेलार हे त्यांच्या ताब्यातील (एमएच 16 जीटी 3021) या वाहनातून जाताना अचानक एक दुचाकीवरून एक व्यक्‍ती आला आणि शेलार यांच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. दुचाकीवरील योगेश दरेकर याने शेलार यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी शेलार यांनी “मारू नको, मी दलित संघटनेचा उपाध्यक्ष आहे’ असे सांगितले असताना देखील दरेकर याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्‍याने मारहाण केली आणि फोन करून नाना दरेकर तसेच दोन अनोळखी युवकांना बोलावून घेतले. यावेळी योगेश दरेकर आणि नाना दरेकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्‍तींनी शेलार हे दलित समाजाचे असल्याची माहिती असताना देखील त्यांना मारहाण करत, जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी तेथे असलेले अविनाश हुगे हे त्यांची भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असताना देखील त्यांनी मारहाण केल्याचे शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तर शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी योगेश शरद दरेकर, नाना दरेकर (रा. सणसवाडी, ता. शिरूर) तसेच दोन अनोळखी व्यक्‍तींवर मारहाण, शिवीगाळ दमदाटी तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याचा पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे आणि पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)