सज्जनशक्‍ती विखरावी

    कथाबोध

 डॉ. न. म. जोशी

एक व्रतस्थ साधू होते. त्यांचा शिष्यपरिवारही मोठा होता. ते गावोगाव सत्संगाच्या मार्गातून समुपदेशन करीत भ्रमण करीत होते. त्यांची वाणी प्रभावशाली होती. त्यामुळे गावोगावचे शेकडो लोक श्रवणानंद घेत असत. असेच एका गावी हे व्रतस्थ साधू गेले होते. तेथील जनसमुदाय भक्‍तिमार्गी होता. त्यांना सद्विचारांची आवड होती. सारा गाव साधू महाराजांच्या सत्संगासाठी गोळा झाला होता. आठ-पंधरा दिवस त्यांचा त्या गावी मुक्काम होता. प्रवचने संपली. साधु महाराजांचा मुक्काम हलला. त्यांचे शिष्यगणही त्यांच्याबरोबर निघाले. निरोप देण्यासाठी गाव लोटला होता. सीमेवर साधू आले. तेव्हा गावच्या प्रमुखानं विनंती केली, “महाराज आम्हाला आशीर्वाद द्या.’ “तुमच्या गावात सारेच सज्जन आहेत. सद्विचारी आहेत. मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि इच्छा व्यक्त करतो की तुम्ही शेतात गहू पेरतात, तसे या प्रदेशात आणि सर्वत्र पेरते व्हा… विखरून राहा.’ “जशी आपली इच्छा,’ गावप्रमुख म्हणाले.

पुढच्या मुक्‍कामासाठी जे गाव निवडलं होतं त्या गावातले लोक आळशी, भांडखोर, कळलावे आणि उचापती होते.
साधू महाराजांनी त्या गावातही प्रवचने दिली. तेथील लोकही मोठ्या संख्येने प्रवचनाला येत असत. पण काहीजण टिवल्या-बावल्या करीत. काहीजण पेंगत, काहीजण मधूनच उठून जात आणि काहीजण दुसऱ्यांच्या खोड्या काढीत. तरीही साधू महाराजांनी त्यांना कोणतीही दूषणे न देता आपला प्रबोधनाचा वसा सोडला नाही. ते शांतपणे आपले कार्य करीत राहिले. अखेर या गावातीलही साधू महाराजांचा मुक्काम संपला. या गावातील प्रमुखानंही साधू महाराजांना विनंती केली. “महाराज इतके दिवस आम्ही तुमची प्रवचनं ऐकली. मागच्या गावातील लोकांना तुम्ही आशीर्वाद दिलात आम्हालाही द्या.’ “देतो. तुम्हालाही आशीर्वाद देतो. तुमचं अभीष्टचिंतन करतो. तुम्ही सारे एखाद्या जलाशयात बेडूक एकत्र राहतात तसे राहा. माझे तुम्हाला आशीर्वाद.’

गावापासून दूर गेल्यावर साधू महाराजांच्या शिष्यांनी विचारलं. “गुरुदेव, मागच्या गावाला तुम्ही गहू पेरतात तसे विखरून राहा असं सांगितलं होतं. या गावाच्या लोकांना जलाशयातले बेडूक एकत्र राहतात तसे राहा असे सांगितलंत. ते का?’
मग साधू महाराज मंद स्मित करत म्हणाले, “माझ्या प्रिय शिष्यांनो, मी दोन गावांत जे दोन वेगवेगळे संदेश दिले, ते तुम्हाला समजलेच नाहीत म्हणायचे. पहिल्या गावाच्या भूमीत सज्जनशक्‍ती विखरून पसरली पाहिजे; म्हणजे त्यांच्यापासून येणारं पीक सज्जनशक्‍तीचं येईल. दुसऱ्या गावात, दुर्जनशक्‍ती एकाच ठिकाणी गोळा व्हावी, म्हणजे ती पसरणार नाही, असे मी संदेश दिले.

  कथाबोध

सज्जन आणि दुर्जन, सद्विचार आणि दुर्विचार, सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांचा लढा सनातन काळापासून आहे. सज्जनशक्‍तीचा सर्वत्र प्रसार व्हायला आणि दुर्जनशक्ती कधीही पसरता कामा नये. दुष्टतेची वाढ होण्याची संधी कधीही देता कामा नये. सज्जनता सर्वत्र कशी पसरेल याची नेहमीच योजनाबद्ध काळजी घेतली पाहिजे. हेच या कथेचे मर्म!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)