सजू लागले बाप्पा!

आले गणराय : पवनमावळात कारागिरांची लगबग

पवनानगर – गणेश भक्‍तांना ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतो, हा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्‍या बाप्पाही घडविण्यात कारागीर मग्न आहेत. गणपती उत्सवाला 13 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असला तरी बाप्पाच्या आगमनाची लगबग मूर्तीकारामध्ये दिसून येत आहे.

-Ads-

गणपतीच्या मूर्त्या आता अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रेखीव रंगरंगोटी सुरू असून, मूर्तिकार मनोभावे बाप्पावर रंगाचा हात फिरवत आहेत. 64 कलांचा अधिपतीही हाच गणेश आणि या श्रीगणेशाच्या मूर्त्या घडविणारेही त्याच्याच भक्‍तांचे हात.

एकीकडे मूर्तिकारांच्या कलेतून मूर्त्यांना आकर्षक रूप दिले जात आहे. तर दुसरीकडे मंडळांना आणि घराघरातही बाप्पाच्या आगमनाचे भक्‍तांना वेध लागले आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे दिवसेंदिवस मूर्त्यांची किंमतही वाढली असली तरी एक गोष्ट मात्र अद्याप कमी झालेली नाही आणि ती म्हणजे गणरायाचे स्वागत करण्यासाठी ओसंडून वाहणारा उत्साह व बाप्पाबदल प्रेम.

श्री गणेशाचे अगदी कोणतेही रूप मन मोहवून टाकते. मग तो बालगणेश असो किंवा मनोहरी गणेशाची मूर्ती… जसा बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ येऊ लागला, तसा मूर्तिकारांच्या हातांनीही वेग घेतला आहे. आपली पूर्ण मेहनत झोकून दिवस-रात्र मूर्तिकारांनी बाप्पाची वेगवेगळी रूपे साकारायला सुरुवात केली आहे, तसेच दुसरीकडे गणेश भक्‍तांची त्याच्या आगमनाच्या जय्यत तयारीसाठी मंडप, देखाव्यांकडे विशेष लक्ष दिले आहे.

आपल्या इच्छेनुसार गणेशभक्‍त मूर्त्यांची ऑर्डर देतात आणि आपल्या नातलगांना, गणेश उत्सवाला मित्रपरिवाराला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आतूर आहे. लहान मुले असो, मोठी माणसे असो किंवा ज्येष्ठ वर्ग असो, सर्वांवर बाप्पाच्या आगमनाचा रंग आता चढू लागला आहे. तर दुसरीकडे मूर्त्यां घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर काही ठिकाणी मूर्तिकार रंगरंगोटी करीत बाप्पांवर अखेरचा हात फिरविण्यात मग्न आहेत.

इकोफ्रेंडली गणपतींची मागणीही वाढली…
सणाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे त्याची जाण ठेवत गेल्या काही वर्षांपासून अनेक गणेशभक्‍तांनी आपले पाय “इकोफ्रेंडली गणेश मूर्त्यांकडे वळवले आहेत. शाडूच्या मातीपासून साकारल्या जाणाऱ्या मूर्त्यांपासून पर्यावरणाची हानी होत नाही आणि विसर्जनही योग्यरित्या होत असते. त्यामुळे यावर्षीही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात शाडूच्या मूर्त्यांची मागणी वाढली आहे; मात्र दुसरीकडे तुलनेने शाडूच्या मूर्त्यांची किंमत अधिक असल्याने आपल्याला हव्या असूनही त्या घेता येत नसल्याची खंतही अनेक भक्‍तांनी व्यक्‍त केली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे पाण्यात विघटन होत नाही. त्या तुलनेने शाडूच्या मातीच्या मूर्त्यांचे पाण्यात योग्य प्रकारे विसर्जन होते.

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करावा…
यावर्षीचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक साजरा करण्याचा संकल्प करुया. केवळ शाडूच्या मूर्ती घेऊन न थांबता ध्वनिप्रदूषण होणार नाही. निर्माल्य विसर्जन समुद्रात करणार नाही, याचीही काळजी घेऊया आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करुया, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे मूर्त्यांच्याही किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या जाचातून बाप्पांचीही सुटका झालेली नाही. “देवाच्या मूर्त्यांची किंमत करणे आम्हाला आवडत नाही, मात्र मालाची किंमत वाढली, तर नाईलाज म्हणून आम्हाला मूर्त्यांची किंमत वाढवावी लागते आणि त्याचा फटका भक्‍तांनाही बसतो. मात्र असे असूनही वाढती मागणी पाहता भक्‍तांचा वाढलेला उत्साह आम्हालाही बाप्पाचे नवे रूप साकारायला बळ देतो, व बाजाराता नवनवीन मूर्ती घडवण्यास बळ मिळत आहे.
– सुरेश कुंभार, मूर्तिकार.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)