सचिवांनो, अधिवेशनात दांडी माराल तर महागात पडेल! 

मुंबई – अधिवेशनाच्या काळात विभागवार चर्चेच्या वेळी संबंधित विभागांच्या सचिवांची उपस्थिती आवश्‍यक असते. मात्र, हे सचिव बिनधास्त अनुपस्थित राहतात. मात्र, आता अधिवेशन काळात सभागृहात अनुपस्थित राहील्यास सचिवांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य सचिवांनी दिला आहे. त्यासंदर्भात त्यांनी परिपत्रकही काढले आहे.

अधिवेशन काळात प्रत्येक विभागवार चर्चा होत असतात. त्यावेळी संबंधित मंत्र्यांना पुरक माहिती मिळावी यासाठी विधिमंडळ गॅलरीत सचिवांची उपस्थिती बंधनकारक असते. यासंदर्भात अनेकदा सभागृहात देखील सदस्यांनी आवाज उठवला आहे. मात्र असे असतानाही महत्वाच्या चर्चेला देखील सचिव अनुपस्थित असल्याचे वारंवार निदर्शनास आलेले आहे.

मुख्य सचिवांनी परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2018 चे पाहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजामध्ये कोणत्याही बाबींच्या अनुषंगाने कोणत्याही विभागाचा मुद्दा केव्हाही उपस्थित होऊ शकतो. विधानमंडळ अधिवेशन काळात सभागृहात ज्या दिवशी त्यांच्या विभागांशी संबंधीत महत्वाचे प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा तास चर्चा, पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदान व इतर महत्वाचे कामकाज असेल त्या दिवशी सचिवांनी सभागृहातील अधिकाऱ्यांनी गॅलरीमध्ये उपस्थित राहावे असे परिपत्रकात नमुद केले आहे.

सभागृहातील चर्चेमध्ये उपस्थित होणाऱ्या मुद्‌द्‌यांबाबत माहिती त्यांच्या मंत्री / राज्यमंत्र्यांना तात्काळ उपलब्ध केली जाईल, याबाबत त्यांनी दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे. शासनाकडून विहीत कालावधीत कार्यवाही न झाल्यामुळे सदस्यांकडून नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कामकाजावेळी सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना परिपत्रकात केल्या आहेत. सूचना न पाळल्यास संबंधीत विभागाच्या सचिवांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबी मुख्य सचिवांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)