सचिन तेंडुलकर सोमवारी पुणे विद्यापीठात

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – तरुण पिढीमध्ये क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी “मिशन यंग ऍण्ड फिट इंडिया’ ही मोहीम सुरू केली आहे. त्याच्या उद्‌घाटनला प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही मुलाखत विद्यापीठ आवारातील आयुकामधील चंद्रशेखर सभागृहात सोमवारी (दि.21 मे ) होणार आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी क्रीडा व शारीरिक विभागाचे संचालक डॉ. दीपक माने, पत्रकार सुनंदन लेले उपस्थित होते. भारतातील तरुण पिढी विविध कारणांमुळे मैदानाकडे फारशी वळत नाही. अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील एक तृतियांश तरुण मुले-मुली कोणताही खेळ खेळत नाहीत किंवा व्यायामही करत नाहीत. या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींना शारीरिक तंदुरुस्ती व खेळाकडे वळविण्याची आवश्‍यकता आहे. त्या दृष्टीने विद्यापीठाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी “मिशन यंग ऍण्ड फिट इंडिया’ची सुरुवात केली जाणार असल्याचे शाळिग्राम यांनी सांगितले.

यानिमित्त सोमवार, दि. 21 मे रोजी दुपारी 2 वाजता “आयुका’च्या चंद्रशेखर सभागृहात कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यात सचिन तेंडुलकर यांची मुलाखत क्रीडा समीक्षक सुनंदन लेले हे घेणार आहेत. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तसेच, मानसशास्त्र तज्ज्ञ डॉ. मीनल सोहनी यांची मनोगते होतील. सोहनी यांचे “मानसिक स्वास्थ’ या विषयावर सादरीकरण होणार आहे. तसेच, शैक्षणिक अभ्यासक्रमात क्रीडा प्रकारांचा अंतर्भाव कसा करता येईल यावर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी राखीव आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)