सचिन अंदुरेला घटनास्थळी आणले

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : सीबीआयकडून तपास

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झालेल्या बालगंधर्व रंगमंदिरामागील महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सचिन अंदुरे याला शुक्रवारी आणण्यात आले होते. त्याला पायी फिरवून घटनास्थळ आणि परिसराची माहिती सीबीआयने घेतली.

सीबीआय पथकाने शुक्रवारी दुपारी सचिन अंदुरेला पुण्यात आणले होते. यावेळी डॉ. दाभोलकरांच्या खून ज्या पुलावर झाला, तो स्पॉट आणि परिसरात त्याला पायी फिरवून त्याच्याकडून माहिती घेण्यात आली. अवघ्या 15 मिनिटांत ही कृती करून सीबीआय त्याला घेऊन निघून गेले. दरम्यान, सचिन अंदुरेला दिलेली सीबीआय कोठडी शनिवारी (दि. 1 सप्टेंबर) संपत असून, त्याला आणि इतर तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी दोघांनी शिंदे पुलावर गोळ्या घालून डॉ. दाभोलकर यांचा खून केला होता. या प्रकरणात सीबीआयने सचिन अंदुरेला 18 ऑगस्ट रोजी अटक केली. तो सीबीआय कोठडीत आहे. त्याने आणि नालासोपारा स्फोटके प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या शरद कळसकर याने दुचाकीवरून येत डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून खून केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. शुक्रवारी (दि.31) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीबीआय पथक चार ते पाच वाहनांमधून शिंदे पुलावर दाखल झाले. शिंदे पुलावर ज्या ठिकाणी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या तेथे काळा बुरखा घातलेल्या सचिन अंदुरेला या पथकाने नेले. तेथून त्याला ओंकारेश्‍वर मंदिरासमोरील चौकातून शनिवार पेठेतील साधना मीडिया सेंटरच्या दिशेने नेले. तेथून वळवून त्याला शनिवार पेठ पोलीस चौकीसमोरून जेथे डॉ. दाभोलकरांची हत्या करण्यात आली, तेथे नेले.

या घडामोडीदरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी थांबवून सीबीआय तपास अधिकारी त्याच्याकडून माहिती घेत होते. पथकाकडून या सर्व प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ शुटिंग करण्यात आले आहे. दाभोलकरांचा खून करण्यात आला त्या ठिकाणी आणल्यानंतर पुन्हा शनिवार पेठ चौकीसमोर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये अंदुरेला बसवून शिंदेपारच्या दिशेने सीबीआयचे पथक वेगात निघून गेले. हा सर्व प्रकार सुमारे 15 मिनिटे सुरू होता. याप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यास संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. ही पाहणी करताना पोलिसांनी घटनास्थळी, पाहणीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या संख्येने पोलीस जमा झाल्याचे पाहून तेथून जाणारे लोक वाहने थांबवून येथे नेमके काय सुरू आहे, हे पाहत होते.

दरम्यान, अंदुरे आणि त्याचा साथीदार हा पुणे शहरात कसे आले? त्याने डॉ. दाभोलकर यांचा खून कसा केला आणि त्यानंतर ते कोठून कसे पळाले, याची माहिती अंदुरेकडून सीबीआय पथकातील अधिकारी घेत असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)