सखोल तपासणीनंतर मिळणार शाळांना निधी

संग्रहित फोटो

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्‍के राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या शाळांना शैक्षणिक शुल्कापोटी निधी अदा करण्यापूर्वी आधी तपासणी पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. पथकांच्या अहवालानंतरच शाळांना निधी वितरित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

आरटीईची 25 टक्‍के प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचे दर निश्‍चिती करण्याबाबत शालेय व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. यात झालेल्या निर्णयाची कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक या सर्वांना याबाबतचे आदेश बजाविले आहेत.

आरटीईच्या राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत गटशिक्षणाधिकारी स्तरावर तपासणी पथके गठीत करण्यात येणार आहेत. या तपासणी पथकामार्फत शाळांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. आरटीई पोर्टल व सरल पोर्टल यावर असलेली विद्यार्थ्यांची नावे व प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांची असलेली उपस्थिती यांचीच आता तपासणी होणार आहे. तपासणी पथकामार्फत पालकांच्या बैठकाही घेण्यात येणार असून यात शाळा फी किती आकारते याची माहिती घेण्यात येणार आहे. तपासणी पथकामार्फत शिक्षणाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर झाल्यानंतरच शाळांना शैक्षणिक शुल्कापोटीचा निधी अदा करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी काढले आहेत.

चौथ्या विशेष फेरीचे नियोजन!
2019-20 या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी जास्तीत जास्त तीनच फेऱ्या घेण्यात येणार आहेत. चौथ्या विशेष फेरी घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जो प्रथम शाळेत दाखल होईल त्यालाच चौथ्या फेरींतर्गत प्रवेश देण्याबाबतचा आदेशही शासनाने जारी केला आहे. शाळांसाठी सवलतीच्या दरात जमिनी मिळविलेल्या संस्थांना आरटीई 20 टक्‍के अंतर्गत शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार नाही. शाळांना निधी अदा करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांच्या स्वतंत्र खात्यात निधी जमा करण्यात यावा. या खात्यातून शाळांना थेट निधी अदा करावा, असेही आदेशात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)