सकाळचं ऊन करा एन्जॉय…(भाग दोन)

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आहारतज्ज्ञांनी एक सर्व्हे केला. ब’ आणि क’ जीवनसत्त्वाच्या अभावापेक्षा ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भारतात जास्त असल्याचं या सर्वेक्षणात आढळून आले. तर जागतिक पातळीवर एक अब्ज लोकांमध्ये ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हाडं, त्वचेच्या आजाराचं प्रमाण अधिक आहे, हेही त्या सर्वेक्षणात नमूद केले. साठ ते सत्तर वर्षांपूर्वी शीत कटिबंधात राहणाऱ्या लोकांना मुडदूस (रिकेट्‌स) नावाचा रोग व्हायचा. मुडदूस म्हणजे हाडं ठिसूळ होणं, दात वेडेवाकडे असणं, वाढ नीट न होणं, दात उशिरा येणं, हाता-पायांची हाडं वाकडी होणं, आतल्या बाजूला वाकणं, त्वचा निस्तेज होणं, फासळ्यांवर गाठी येणं हे सर्व आजार लहान मुलांमध्ये विशेषत्वाने आढळून यायचे.

शास्त्रज्ञांनी 20 वर्षांपूर्वी असं भविष्य वर्तवलं होतं की, भारतासारख्या सूर्यप्रकाश भरपूर मिळणाऱ्या देशात मुडदूस हा आजार होत नाही. कारण भारत उष्ण कटिबंधातील देश आहे. पण सध्या भारतात खासकरून मुंबईत हाडं, त्वचेच्या आजाराचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलंय. हे आजार ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतात, हा मुद्दा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आहारतज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणातून अधोरेखित झालाय. ब’ आणि क’ जीवनसत्त्वाच्या अभावापेक्षा ड’ जीवनसत्त्वाची कमतरता देशात जास्त असल्याचं या सर्वेक्षणात आढळून आलंय.

 तुटवडा भरून काढण्यासाठी.. 

सूर्यप्रकाश हा ड’ जीवनसत्त्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. आठवड्यातून सकाळी दहा पूर्वी तीन ते चार वेळा सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसावं. सूर्यप्रकाशाच्या व्यतिरिक्‍त साल्मन मासे, सारडीन्स मासे, शेळीचं दूध, शायटेक अळंबी, अंडी यांमध्ये ड’ जीवनसत्त्व मोठया प्रमाणावर असतं. कार्ड लिव्हर ऑईलही ड’ जीवनसत्त्वाचा पूरक स्त्रोत आहे.

 हे लक्षात ठेवा.. 

ड’ जीवनसत्त्व कृत्रिम स्वरूपात घेण्यापेक्षा नैसर्गिक स्वरूपात घेणं चांगलं. ड’ जीवनसत्त्वाचं शरीरातील अतिरिक्‍त प्रमाण हे मूत्रपिंडावर परिणाम करतं. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपात ड’ जीवनसत्त्व घेतलेलं चांगलं. दुपारच्या कडक उन्हात मुलांना खेळू देऊ नये. सूर्यप्रकाशरक्षक (सन ब्लॉक) वापरावा. एसपीएफ 15 किंवा त्यापेक्षा जास्त प्रतीचा वापरावा उन्हात जाताना कपडे पांढऱ्या रंगाचे आणि सैल असावे. टी शर्ट आणि हॅट वापरावी. अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून त्वचेला किती धोका असतो हे मुलांना सोप्या शब्दांत समजावून सांगावे.

  काय टाळायला हवे? 

दुपारचे ऊन खूप कडक आणि प्रखर असते. म्हणून दुपारी बाहेर जाण्याचे टाळावे. अकरा ते तीन ही वेळ जास्त धोक्‍याची असते. या वेळात शक्‍यतो घरी असावे किंवा बाहेर जायचेच असेल तर पांढरे कपडे घालावे. हॅट वापरावी. डोळ्याला गॉगल लावावा. त्वचेला सनक्रिम लावावे आणि मगच बाहेर पडावे. डोंगराळ भागात आणि उन्हाळयात सूर्यप्रकाश खूप तीव्र असतो. पाणी वाळू आणि बर्फ यावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश जास्त धोकादायक असतो. दुपारच्या प्रखर उन्हात जास्त वेळ हिंडू नये. अधूनमधून सावलीत थांबावे. उन्हामध्ये त्वचा रापू देऊ नये. प्रखर उन्ह असेल तर अवघ्या पंधरा मिनिटात त्वचा काळी पडते.

सूर्यप्रकाशापासून रक्षण कसे करावे? 

अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करण्यासाठी आता मलमे मिळू लागली आहेत. ते कोणत्या प्रतीचे म्हणजे सन प्रोटेक्‍शन फॅक्‍टरचे आहे ते बघणे आवश्‍यक आहे. त्याची प्रत जेवढी जास्त असेल तितका वेळ जास्त आपण उन्हात हिंडू शकतो.उदा. एसपीएफ 15 प्रतीचे असेल तर पंधरा गुणिले वीस म्हणजे तीनशे मिनिटे आपण उन्हात सुरक्षितपणे हिंडू शकतो. उन्हात त्वचा रापायला साधारण पंधरा ते वीस मिनिटे लागतात. त्याच्या पंधरा पट हे मलम आपल्याला सुरक्षा देते.

पंधरा किंवा त्यापेक्षा जास्ततिचे मलम वापरावे. जो भाग उन्हात उघडा असतो उदा. चेहरा, मान, कान, गळा, हात, बोटे इत्यादी भागांवर मलम चोळावे. डोळ्यांच्या पापण्यांवरही लावावे.उन्हात बाहेर पडण्यापूर्वी अर्धा तास आधी हे मलम लावायला हवे. हे मलम लावल्यामुळे सूर्यप्रकाशातली अल्ट्राव्हायोलेट किरणे त्वचेमध्ये शिरू शकत नाहीत. काही अपारदर्शक आणि रंगीत मलमे सर्वच सूर्यप्रकाश रोखण्याचे काम करतात. अशा मलमांमध्ये झिंक ऑक्‍साईड किंवा फिटॅनियम डायऑक्‍साईड असते. अशी मलमे नाक,ओठ,खांदे या भागांना लावावीत. कारण या भागांना अल्ट्राव्हायोलेट किरणांचा जास्त धोका असतो. ही मलमे तान्ह्या मुलांना लावली तरी हरकत नाही.

डॉ. शितल जोशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)