संस्कृत भाषेचा डंका सातासमुद्रापार 

प्रा. विजया पंडित 

पूर्व युरोपातील यूक्रेन या देशातील 14 युवक-युवतींचा एक गट वाराणसी येथे संस्कृतच्या अध्ययनासाठी नुकताच आला होता. या गटात रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक, डॉक्‍टर आणि शिक्षक सहभागी आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये संस्कृत शिकण्याविषयी आस्था निर्माण होत असताना भारतात मात्र या भाषेविषयी अनास्था दिसून येते. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचे ज्ञान घेणे चूक नाही; परंतु त्यासाठी आपल्याच समृद्ध भाषेकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरत नाही. 

संस्कृत ही भारतातील एक प्राचीन आणि संपन्न भाषा असून, देवभाषा नावाने ती ओळखली जाते. संस्कृत जितकी अवघड तितकीच ती परिपूर्ण भाषा आहे. संस्कृत पूर्णपणे शिकलेल्या व्यक्तीला जगातील कोणतीही अवघडात अवघड भाषा लगेच आत्मसात करता येते, असे म्हणतात. अशा या प्रदीर्घ परंपरा असलेल्या संस्कृत भाषेला सातासमुद्रापार, परदेशातील लोक आत्मसात करू लागले आहेत, ही भारताच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. पूर्व युरोपातील यूक्रेन या देशातील युवक-युवतींचा गट काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. वाराणसीत येऊन संस्कृत शिकणे हाच या गटाचा उद्देश होता. या युवक-युवतींमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्यांपासून डॉक्‍टर, शिक्षकांचाही समावेश होता. शंभराहून अधिक घाट असलेले वाराणसी शहर हिंदूंचे पवित्र शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात आजमितीस वेगवेगळ्या 70 देशांमधील 190 विद्यार्थी संस्कृतचे ज्ञान घेत आहेत. याखेरीज म्यानमार, कोरिया, श्रीलंका, थायलंड येथील विद्यार्थीही संस्कृत भाषेचे अध्ययन करताना वाराणसीत दिसतात.

वाराणसीत येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा पदविका अर्जित करण्यापेक्षा तीन वर्षांची पदवी घेण्यात अधिक रस असल्याचे दिसून आले आहे. या युवकांच्या म्हणण्यानुसार, जे संस्कार आणि संस्कृती संस्कृत भाषेत आहे, ती जगातील अन्य भाषेत नाही. संस्कृत शिकायचे म्हणजे घोकंपट्टी करायची, असेच अनेकांना वाटते. परंतु काशीतील शिवाला येथील वाग्योग चेतना पीठातील प्राध्यापकाच्या सांगण्यानुसार, तेथील अध्यापकांनी एक असा अभ्यासक्रम तयार केला आहे, ज्याद्वारे केवळ 180 तासांत घोकंपट्टी न करता संस्कृतचे उत्तम ज्ञान ग्रहण करता येते.
संस्कृत शिकल्यामुळे मेंदू तल्लख बनतो आणि स्मरणशक्ती वाढते असा अनुभव आहे. त्यामुळे लंडन आणि आयर्लंडमधील अनेक शाळांमध्ये संस्कृत विषय सक्तीचा करण्यात आला आहे.

आपल्याकडील जुने पौराणिक ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे, संस्कृत भाषेत जगातील अन्य कोणत्याही भाषेपेक्षा अधिक शब्द आहेत. सद्यःस्थितीत संस्कृतच्या शब्दकोशात 120 अब्ज 78 कोटी, 50 लाख इतके शब्द आढळतात. कोणत्याही विषयाचे ज्ञान घेण्यासाठी संस्कृत हा एक खजिनाच आहे. केवळ हत्ती या एका शब्दासाठी संस्कृतमध्ये 100 पेक्षा अधिक प्रतिशब्द आहेत. इतर कोणत्याही भाषेच्या तुलनेत कमीत कमी शब्दांत संस्कृतमधील वाक्‍य पूर्ण करता येते. “सुधर्मा’ हे संस्कृतमधील पहिले वर्तमानपत्र होते आणि आजही या वृत्तपत्राची ऑनलाइन आवृत्ती उपलब्ध आहे. जर्मनीतील सर्वांत उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या 14 विद्यापीठांमधून संस्कृत शिकविले जाते. ब्रिटनमध्ये चार विद्यापीठे संस्कृतमधील अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. आतापर्यंत 34 देशांमधील 254 विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हिडेलबर्ग विद्यापीठाच्या साउथ इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये संस्कृत भाषेबाबत प्रचंड मागणी आल्यामुळे स्वित्झर्लंड, इटलीसह भारतातही या संस्थेतर्फे “स्पोकन संस्कृत’ वर्ग सुरू केले जाणार आहेत.

कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात मत्तूर नावाचे छोटेसे गाव आहे. या गावातील लोकांची मातृभाषा कन्नड आहे. तरीही या गावातील सर्वच्या सर्व लोक संस्कृतमध्ये बोलतात. या गावातील मुलांना दहाव्या वर्षापासून वेदांचे शिक्षण दिले जाते. संस्कृत शिकल्यामुळे विद्यार्थ्यांना गणित आणि तर्कशास्त्राचा अभ्यास करणेही सोपे जाते. मत्तूरमधील अनेक युवक परदेशांत अभियांत्रिकी किंवा चिकित्सा विषयातील अभ्यासासाठी जातात. या गावातील प्रत्येक घरातील किमान एकजण सॉफ्टवेअर इंजिनिअर बनतो. येथील प्रत्येक घराच्या भिंतीवर संस्कृत भाषेत सुविचार लिहिलेले आढळतात. हे सुविचार ग्राफिटीच्या स्वरूपात आकर्षक पद्धतीने रंगविले जातात. काही घरांवर तर अभिमानाने पाटी लावलेली दिसते – “आप इस घर में संस्कृत बोल सकतें हैं.’ तर भोपाळमध्ये “ध्रुव रॉक बॅंड’ नावाचा दहा जणांचा चमू आहे. शास्त्रीय आणि पाश्‍चात्य संगीतात संस्कृत गीतांचे सादरीकरण हा ग्रुप करीत आहे. या बॅंडचे प्रमुख डॉ. संजय त्रिवेदी सांगतात की, संस्कृत ही सामान्यांची भाषा बनविणे हा आमचा उद्देश आहे.

संस्कृतची ताकद खरोखर फार मोठी आहे. या भाषेत अर्थाचा अनर्थ होण्याचा धोका सर्वांत कमी आहे इतकी ती परिपूर्ण भाषा आहे. संस्कृतमधील सर्वांत पहिल्या श्‍लोकाची रचना महर्षि वाल्मिकी यांनी केली होती, असे मानले जाते. आपल्याला मिळालेल्या काव्यरचनेच्या प्रेरणेबद्दल त्यांनी स्वतः असे लिहिले आहे की, ते क्रौंच पक्ष्याच्या प्रणयरत जोडीला न्याहाळत होते. ही जोडी प्रणयात मग्न झाली होती. त्याच वेळी त्यातील एका पक्ष्याला एक बाण लागला आणि जागीच त्या पक्ष्याचा मृत्यू झाला. हे पाहून महर्षि वाल्मिकी अत्यंत व्यथित आणि क्रोधित झाले. ही व्यथा आणि संताप व्यक्त करण्यासाठी त्यांच्या तोंडून जे उद्‌गार निघाले, तोच संस्कृतमधील पहिला श्‍लोक मानला जातो.

आज हॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी त्यांच्या शरीरावर संस्कृत भाषेत टॅटू काढून घेतलेले दिसतात. अँजेलिना जोलीने तिच्या पहिल्या मुलीच्या शरीरावर संस्कृत टॅटू काढून घेतला होता. या टॅटूवरील मजकुराचा अर्थ होता – “तुझे शत्रू तुझ्यापासून दूर राहोत. तू खूप पुढे जा. तुझे रूप अप्सरेसारखे उजळू दे.’ कॅटी पॅरीने आपल्या शरीरावर संस्कृतमध्ये गोंदविलेल्या वाक्‍याचा अर्थ “प्रवाहाबरोबर चालत राहा,’ असा होतो. जेसिका अल्वाने आपल्या मनगटावर “पद्म’ हा शब्द गोंदवला आहे. ब्रिटनीने आपल्या टाचेवर “अभय’ शब्द लिहवून घेतला आहे. निडर असा या शब्दाचा अर्थ होतो. वाराणसी येथील वकील श्‍यामजी उपाध्याय 38 वर्षांपासून न्यायालयात संस्कृत भाषेत युक्तिवाद करतात. दरवर्षी संस्कृत दिवस साजरा करणारे श्‍यामजी सांगतात की, संस्कृतमधून खटले लढविणारे ते भारतातील एकमेव वकील आहेत. सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या दिवशीही संस्कृत भाषा चर्चेत राहिली होती; कारण अनेक खासदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती.

अमेरिकन हिंदू विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, संस्कृतमध्ये संभाषण करणाऱ्या माणसाला रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल या आजारांपासून दूर राहता येते. संस्कृतमध्ये बोलणाऱ्या माणसाच्या शरीरातील रक्ताभिसरण संस्था सक्षम होते. त्यामुळे माणूस सकारात्मक ऊर्जेने कार्यरत होतो. स्पीच थेरपीसाठीही संस्कृत उपयुक्त ठरते. संस्कृतमुळे एकाग्रता वाढते. लखनौमधील निशांतगंज भागात एक भाजीमंडई असून, तेथे संस्कृतमध्ये व्यवहार होतात. सर्व भाज्यांची नावे संस्कृत भाषेत उच्चारली जातात. सगळीकडे संस्कृत फलक लावण्यात आले आहेत. संस्कृत ही आमची प्रमुख भाषा आहे, असे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे. संस्कृत भाषेला चालना देण्यासाठी मोहीमही चालविली जात आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे म्हणून ती ग्रहण करायला हवी, असे सर्वांचे मत आहे. जी आपली भाषा सातासमुद्रापार आपले वैशिष्ट्य दाखवून देत आहे, त्या संस्कृतकडे पाठ फिरविणे योग्य नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)