संस्कारांचा वारसा देणारी एकमेव बँक म्हणजे आई !

भाऊसाहेब कोकाटे : सुबोध व्याख्यानमालेत व्याख्यान

निगडी – या जगात संस्कारांचा वारसा आपल्या मुलांना कायम देणारी एकमेव बॅंक म्हणजे आई असते. यामुळे ज्याच्या घरात आई-वडील आहेत, तोच खरा श्रीमंत माणूस असतो, असे प्रतिपादन व्याख्याते भाऊसाहेब कोकाटे यांनी सुबोध व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुंफताना केले.

श्री खंडोबा मंदिर प्रांगण, आकुर्डी येथे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व आकुर्डी ग्रामस्थप्रणीत आणि पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती आयोजित तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत आई वात्सल्याचा झरा या विषयावर अंतिम पुष्प गुंफताना भाऊसाहेब कोकाटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास पाटील होते. प्रभाकर पवार, गोविंद काळभोर, निखिल शिंदे, मुख्य संयोजक शंकर काळभोर यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाऊसाहेब कोकाटे म्हणाले की, प्रभू रामचंद्रांची कौसल्या, पांडवांची कुंती, जिजाऊ मॉंसाहेब, श्‍यामची आई किंवा आजच्या काळातील कोणतीही आधुनिक आई असो, तिचे ममत्व बदलत नाही. जिन्स घालणारी, लिपस्टिक लावणारी अत्याधुनिक आई असली तरी तिच्यात मुलांवर संस्कार करण्याची क्षमता हवी. यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेल्या माणसाची आई जर वृद्धाश्रमात असेल तर त्याच्या यशाला लौकिकार्थाने काहीच किंमत नसते. छत्रपती शिवराय हे लहानपणी घोडेस्वारी करताना खाली पडले. जिजाऊ मॉंसाहेब समोरच होत्या; पण त्यांनी शिवबांना उचलून घेतले नाही. शिवबा रडवेले होऊन जिजाऊंना म्हणाले की, मॉंसाहेब, आपण आम्हाला उचलून का नाही घेतले? तेव्हा जिजाऊ म्हणाल्या, शिवबा, प्रत्येक ठिकाणी खाली पडल्यावर तुम्हाला उचलून घ्यायला आम्ही असणार नाही म्हणून तुम्ही स्वतःला सावरायला हवे! अशा छोट्या छोट्या प्रसंगांमधून शिवराय घडले.

छोटा श्‍याम अंघोळीनंतर आईला म्हणाला, तुझ्या पदराने माझे पाय पूस, नाहीतर माझ्या तळपायाला माती लागेल! तो असे म्हणाल्यावर श्‍यामची आई म्हणाली, बाळा, तळपायाला माती लागू नये म्हणून इतका जपतोस, तसेच मनाला माती लागू नये म्हणूनही जप! या शिकवणीचा श्‍यामच्या मनावर सखोल परिणाम झाला आणि त्यातूनच सुसंस्कारित सानेगुरुजी घडले. अशा श्‍यामच्या आईची आज समाजाला गरज आहे. संस्कारांचे बाळकडू आपल्या बाळाला देणारी आई जर संस्कारित नसेल तर समाजाची अधोगती होते.

समाजातील वास्तव घटना, ज्ञानेश्वरांची आई, थॉमस एडिसनची आई असे अनेक संदर्भ उद्धृत करीत भाऊसाहेब कोकाटे यांनी आपल्या ओघवत्या शैलीने श्रोत्यांना अंतर्मुख केले. सुभाष पागळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)