संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

सत्ताधारी आणि विरोधकांमधील सामना रंगणार

नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मोदी सरकारचे ते अखेरचेच अधिवेशन ठरणार आहे. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्‌द्‌यांवरून जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने अधिवेशनाचा प्रारंभ होईल. त्यानंतर शुक्रवारी अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन सरकारकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला खूष करणाऱ्या घोषणा होण्याची शक्‍यता आहे. मात्र, लवकरच कार्यकाळ समाप्त होत असल्याने सरकारला तशा घोषणा करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका विरोधकांकडून घेतली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदेत जोरदार राजकीय संघर्ष होईल. तिहेरी तलाक आणि नागरिकत्व दुरूस्तीशी संबंधित विधेयके संसदेत मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. त्या विधेयकांवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मुकाबला होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता 13 फेब्रुवारीला होईल.

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्या बैठकीत सभागृहाचे कामकाज सुरळित चालावे यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिल्याचे महाजन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, मागील अनुभव पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशनावर गदारोळाचे सावट राहण्याचीच शक्‍यता अधिक आहे. विरोधकांकडून प्रामुख्याने राफेल व्यवहार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून सरकारची कोंडी केली जाण्याची चिन्हे आहेत. विविध मुद्‌द्‌यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्यास आणि सत्ताधाऱ्यांनी जशास तसे ही भूमिका स्वीकारल्यास संसदेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)