संसदीय समितीकडून उर्जित पटेल यांना समन्स

नवी दिल्ली :  देशभरातील बँक घोटाळ्यांवर भाष्य करण्यासाठी संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार, येत्या १७ मे रोजी यासंबंधी प्रश्नांवर त्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील अर्थ खात्याच्या स्थायी समितीने मंगळवारी अर्थविषयक सेवा विभागाचे सचिव राजीवकुमार यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, गव्हर्नरला समन्स बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सुद्धा या समितीचे सदस्य आहेत. १७ मे रोजी बँक घोटाळ्यांसंबंधी आणि बँकांच्या नियमावलींबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना आम्ही प्रश्न विचारणार आहोत, असे समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत कारवाईचे रिझर्व्ह बँकेला पुरेसे अधिकार नाहीत, असे नुकतेच सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पटेल यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना नक्की कुठल्या प्रकारच्या अधिकारांची आवश्यकता आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. बँकांच्या कारभारावर नजर ठेवणे हे रिझर्व्ह बँकेचे काम आहे. त्यामुळेच पटेल यांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील बँकांबाबत चर्चा होणार असल्याचेही म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)