संविधान दिनाबाबत पंतप्रधानांकडून देशाची दिशाभूल

विखे-पाटील यांचा आरोप

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन त्यांच्याच काळात देशामध्ये संविधान दिवस साजरा करण्यास सुरूवात झाल्याचे ढोल बडवले. मात्र या निर्णयाची महाराष्ट्रात मागील 9 वर्षांपासून अंमलबजावणी होत असल्याबद्दल त्यांनी साधा उल्लेखही केला नाही, हे दुर्दैव असून संविधान दिनाबाबत मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईमध्ये भाषण करताना पंतप्रधानांनी जणू असा आभास निर्माण केला की, देशात त्यांनीच सर्वप्रथम संविधान दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने 24 नोव्हेंबर 2008 रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी करून सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा-महाविद्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्याचे आदेशही दिले होते, याची आठवण करून देतानाच संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कॉंग्रेसने कधी त्याचा गाजावाजा केला नाही किंवा त्याला केवळ एक “इव्हेंट’ म्हणून साजरा केला नाही; तर संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठीच त्याचे आयोजन केले, असे विखे-पाटील म्हणाले.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानचे एक घावात दोन तुकडे करण्यात आले. बांग्लादेशची निर्मिती करून भारताची पूर्व सीमा सुरक्षित करण्यात आली. आपल्याला इंदिरा गांधी यांच्यासारखे कणखर निर्णय घेता येत नाहीत, याचे भाजपला शल्य आहे. भाजप सरकारने पाकिस्तानात “सर्जिकल स्ट्राईक’ केला. पण त्याचे परिणाम कुठेच दिसून येत नाहीत. आता काश्‍मिरचा प्रश्न इतका चिघळला की, तेथील सरकारमधून भाजपला अक्षरशः पळ काढावा लागला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपण चार वर्षात काय केले, याबद्दल काहीही सांगता येत नसल्याने भाजपने चार दशकांपूर्वी काय घडले, यावर बोलायला सुरूवात केली आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी, देशातील ज्वलंत समस्यांवरून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी केलेली ही एक खेळी आहे. पण देशातील जनता सूज्ञ आहे आणि या नकारात्मक राजकारणाची भाजपला मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशाराही विखे पाटील यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)