बावडा- देशातील संघराज्य पध्दती संविधानामुळे मजबुतीने उभी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा (ता. इंदापूर) गावामध्ये सोमवारी (दि. 26) येथील बाजारतळ येथे आयोजित भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अशोक घोगरे, अशोक माने, शिवाजी मखरे, राकेश कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे उपस्थित होते. पाटील म्हणाले, देशातील सर्व समाज एकसंघ ठेवण्याची शक्ती देशाच्या संविधानामध्ये आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लिहलेले भारतीय संविधान हे जगातील आदर्श संविधान मानले जाते. कार्यक्रमाचे आयोजन दलित पॅन्थर व रिपब्लिकन पक्ष (ऐ) यांच्या संयुक्त वतीने विकास कांबळे, अनिल कांबळे, राकेश कांबळे, जिग्नेश कांबळे,लक्ष्मण गायकवाड, अश्वजित कांबळे यांनी केले. यावेळी सभेत संविधान प्रतिज्ञेचे वाचन अखिल कांबळे यांनी केले. आंबेडकर उद्यान ते बाजारतळ अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सूत्रसंचालन कालिदास आव्हाड यांनी केले. विकास कांबळे यांनी आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा