संवाद वारीमुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

लोणंद ः संवादवारी उपक्रमाचे फित कापून उद्घाटन करताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल शेजारी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, डॉ. देवानंद शिंदे.

सातारा दि. 13 (प्रतिनिधी) – नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना सर्वदूर पोहोचवण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा संवाद वारी उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला.
लोणंद शासकीय विश्रामगृह येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित संवाद वारी उपक्रमाचे उद्घाटन श्रीमती सिंघल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, वाई-खंडाळ्याच्या उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव तसेच प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल म्हणाल्या, नागरिकांच्या विकासासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबविते. संवाद वारीच्या माध्यमातून चित्र प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन तसेच कलापथक व पथनाट्य या माध्यमातून पंढरपूरपर्यंत वारकरी व नागरिकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग करुन कुटुंबाचा व गावचा विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे सांगून प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेला वारी ऍप, मार्गदर्शक पुस्तिका व अन्य उपक्रमांचीही माहिती श्रीमती सिंघल यांनी दिली.
संवाद वारीद्वारे योजनांची माहिती देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे, असे सांगून पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, आषाढी वारी काळात पोलीस प्रशासनाने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळीउपस्थित मान्यवरांनी चित्र प्रदर्शन, एलईडी व्हॅन, चित्ररथाची पाहणी केली. तसेच कलापथक व पथनाट्याचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी सादर करण्यात आलेल्या पोवाडे व पथनाट्याला उपस्थित वारकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन दाद दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)