भारताने नोंदवली प्रतिक्रीया
संयुक्तराष्ट्रे – संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या बैठकीत जम्मू काश्‍मीर विषयावर या आयोगाच्या आयुक्त मिचेल बचेलेत यांनी केलेले विधान खेदजनक आहे अशी प्रतिक्रीया भारताने नोंदवली आहे.

सोमवारी आयुक्त मिचेल यांनी बैठकीच्या सुरूवातीलाच आपले मनोगत व्यक्त करताना त्यात जम्मू काश्‍मीरातील स्थितीचा उल्लेख करीत तेथील मानवाधिकाराच्या स्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर काय उपाययोजना करायची यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. जगातले अन्य लोक ज्या सन्मानाने जगतात त्याच स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार काश्‍मीरातील लोकांना मिळायला हवा असले फाजील विधानही त्यांनी केले होते.

त्यावर प्रतिक्रीया नोंदवताना भारताचे जिनिव्हा येथील कायम प्रतिनिधी राजीव चंदर म्हणाले की जम्मू काश्‍मीरच्या विषयावर भारताने आपली भूमिका मानवाधिकार कौन्सीलपुढे या आधीच स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय स्वायत्तता, प्रादेशिक एकात्मता, पारदर्शकता आणि विश्‍वासार्ह पद्धतीने तेथील समस्येवर उपाय शोधले जात आहेत. ही स्थिती आम्ही अत्यंत स्पष्टपणे निर्देशित केली असतानाही या आयोगाच्या बैठकीत जम्मू काश्‍मीर मधील स्थितीचा उल्लेख होणे हे अनुचित आहे असेही राजीव चंदर यांनी नमूद केले.

ते म्हणाले की दहशतवाद हाच मानवाधिकाराचा सर्वात मोठा शत्रु आहे. त्यामुळे दहशतवादाच्या विषयावर मिचेल या अधिक परिणामकारकपणे आपली भूमिका आगामी काळात बजावतील अशी खोचक टिपण्णीही त्यांनी केली. पाकिस्तानचे जिनीव्हातील कामय प्रतिनिधी फारुख अमिल यांनीही या बैठकीत काश्‍मीरचा प्रश्‍न उपस्थित करून आपलीही हौस भागवून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)