संमेलनाच्या वादाला राजकिय रंग; सरकारचा कोणताही संबंध नाही : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी सहगल यांची माफी मागावी – विरोधकांची मागणी

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना देण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता राजकीय रंग चढला. नयनतारा यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी नयनतारांची क्षमा मागून त्यांना सन्मानाने संमेलनाला बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. विरोधी पक्षाने सरकारलाच लक्ष्य केल्यानंतर सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाशी सरकारचा संबंध नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येत्या 11 आणि 12 जानेवारी रोजी यवतमाळ येथे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. आयोजकांनी या संमेलनाला उदघाटक म्हणून इंग्रजीतील ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण दिले होते. मात्र, सहगल आपल्या भाषणात अस्वस्थ वर्तमान आणि देशात वाढत चाललेल्या असहिष्णुतेवर परखड भाष्य करतील, या भीतीपोटी आयोजकांनी त्यांचे निमंत्रण रद्द केल्याचे बोलले जाते. या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला सोमवारी राजकीय फोडणी मिळाली.

सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाही विरोधी आणि घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आहे. त्यामुळे सहगल यांना देण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कुणी घेतला? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाने लगेच खुलासा केला. साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही याचा निर्णय सर्वस्वी संमेलनाचे आयोजकच घेत असतात. त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयात मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो, असेही असे मुख्यमंत्री कार्यालयाने खुलाशात स्पष्ट केले आहे.

सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी आणि घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा आहे. संमेलनाला पुरेशी सुरक्षा देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असताना सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनीच यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याची आवश्‍यकता आहे.
– राधाकृष्ण विखे-पाटील,
विधानसभा विरोधी पक्षनेते

नयनतारा यांचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून रद्द करण्यात आले आहे. जर तसे नसेल तर राज ठाकरेंप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून नयनतारा सहगल यांची क्षमा मागवी आणि त्यांना साहित्य संमेलनाला सन्मानाने बोलावावे.
नवाब मलिक, मुख्य प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)