संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी “व्हिप’!

भाजप सतर्क : राष्ट्रवादीचे आव्हान, महापौर निवडणुकीत रंगत

पिंपरी – महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप मधील नाराजांची मोट बांधून सत्ताधाऱ्यांना आव्हान निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने सतर्कता बाळगून पक्षाच्या नगरसेवकांसाठी “व्हिप’ जारी केला आहे. वास्तविक, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यात “समझोता’ असला तरी संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी काळजी घेतली जात असल्याची चर्चा आहे.

-Ads-

भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नाराज गट आणि निष्ठावंत गट यांच्यामुळे महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत रंगत येईल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. परिणामी, 77 नगरसदस्य असलेल्या सत्ताधारी पक्षाला आपल्याच नगरसेवकांसाठी “व्हिप’ जारी करण्याची वेळ आली आहे. आपले एकही मत फूटू नये याची खबरदारी यातून सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे.

महापालिकेत विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता, ताकद नसतानाही त्यांनी महापौर व उपमहापौरपद निवडणुकीत आपले उमेदवार दिले आहेत. सत्ताधारी पक्षाने “व्हिप’ जारी केल्याने एखाद्या सदस्याने विरोधात मतदान केले, तर त्याचे सदस्यत्व रद्द करता येणार आहे. त्यामुळेच सभागृह नेते एकनाथ पवार यांनी “व्हिप’ जारी केला आहे.

महापौरपदासाठी सत्ताधारी शहर भाजपमधील मूळ एकनिष्ठ भाजपा गट प्रबळ दावेदार होता. त्याजोडीने भाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप गटाने भोसरी विधानसभा मतदारसंघात असलेले हे पद आपल्याकडे घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरु होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हा गट नुकताच भेटून आला होता.मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. भाजपचे सहयोगी सदस्य आणि भोसरीचे आमदार यांचे समर्थक राहूल जाधव यांना देण्यात आली. परिणामी जुन्या भाजपा गटाबरोबर चिंचवडचा गटही नाराज झाला आहे. त्याचा फटका महापौर व उपमहापौर निवडीत बसू नये म्हणून “व्हिप’ जारी करण्याची सावधगिरी सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. यासाठी सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक सदस्याला फोन करुन सांगितले जात आहे. अवघे 36 इतके संख्या असणाऱ्या विरोधी पक्षाकडून आणि स्वतःच्या पक्षातून काही दगाफटका होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून “व्हिप’ जारी केला आहे.

बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद निवड बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी 24 जुलैला आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून नगरसेवक राहुल जाधव यांनी मंगळवारी (दि.31) अर्ज सादर केला. तर, उपमहापौर पदासाठी नगरसेवक सचिन चिंचवडे यांनी अर्ज भरला आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विनोद नढे यांनी महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी विनया तापकीर यांनी अर्ज सादर केला. त्यामुळे शनिवारी (दि. 4) सकाळी अकराला होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत या दोन्ही पदासाठी निवडणूक होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पालिकेत भाजपचे संख्याबळ पक्षाचे 77 नगरसेवक आणि अपक्ष 5 नगरसेवक असे एकूण 83 संख्याबळ आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपचा महापौर व उपमहापौर होणार हे निश्‍चित झाले आहे. मात्र, ही निवड बिनविरोध व्हावी म्हणून भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.

सत्ताधारी-विरोधकांची चर्चा
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची गुरूवारी (दि.2) भेट घेऊन चर्चा केली. महापौर व उपमहापौरपद हे शहरासाठी महत्त्वाचे पद आहे. सभागृहाचा मान राखण्यासाठी ही निवड बिनविरोध होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेले उमेदवारांचे अर्ज माघारी घ्यावेत, अशी विनंती पवार यांनी त्यांना केली. त्यावर साने व वाघेरे यांनी सांगितले की, पक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. त्यांनी सहमती दिल्यास अर्ज माघारी घेण्याचा निर्णय होईल. अन्यथा लोकशाहीचा नियमानुसार आम्ही निवडणुकीस तयार आहोत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)