संभाजी राजे क्रीडा संकुलाची दूरवस्था

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : भाजप नगरसेवकांची तक्रार

निगडी – यमुनानगर येथे महापालिकेचे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे क्रीडा संकुल अस्तित्वात आहे. पण संकुलाची दूरवस्था झाली आहे. एकीकडे क्रीडांगणाचा अभाव असताना दुसरीकडे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे क्रीडा संकुलाच्या झालेल्या दूरवस्थेबद्दल भाजप नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे व नगरसेविका कमल घोलप यांनी संताप व्यक्‍त केला.

यासंदर्भात प्रा. केंदळे व कमल घोलप यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त योगेश कडूसकर आणि फ क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, यमुनानगर आणि सेक्‍टर 22 येथे महापालिकेच्या दोन शाळा तसेच माता अमृतानंदमयी विद्यालय, शिवभूमी विद्यालय, मॉडर्न विद्यालय, एस. पी. एम. विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय या शाळांमधील विद्यार्थी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या हजारोंच्या घरात असून क्रीडाप्रेमी नागरिकही या भागात मोठ्या प्रमाणात राहतात, त्याचबरोबर या ठिकाणी व्यायामशाळा व जलतरण तलाव याकडेही नागरीक व तरुणांचा मोठ्या प्रमाणात कल आहे.

महापालिकेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजे क्रीडा संकुलाची मोठ्‌या प्रमाणावर दूरवस्था झाली आहे. याठिकाणी केवळ खेळांचे नामफलक अस्तित्वात आहेत. खेळाडूंसाठी कोणतीही सुविधा येथे नाही. एकीकडे खेळासाठी मैदाने, संकुले उपलब्ध नसताना दुसरीकडे क्रीडा संकुलाची झालेली दूरवस्था संतापजनक आहे. महापालिकेने खेळाडूंची गैरसोय लक्षात घेवून या क्रीडा संकुलाची दूरवस्था दूर करावी. त्याचा कायापालट करुन त्याला एक सुसज्ज मल्टीस्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍सचे रुप द्यावे. जास्तीत जास्त मैदानी व अंतरगृही (इनडोर) खेळांचा त्यात समावेश करावा. टेनिस, कबड्डी, खो-खो, कुस्ती, मल्लखांब, हॉलीबॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कराटे, कौशल्य विकासाचे खेळ, धनुर्विद्या अशा खेळांचा तसेच योगा केंद्र याचाही त्यात समावेश असावा त्यासाठी लागणारे साहित्य व कोच याचीही व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे खेळाडूंना व्यासपीठ मिळेल व खेळाडू घडवण्यास हातभार लागेल. आदर्श अशा क्रीडा संकुलाची याठिकाणी उभारणी करावी, अशी मागणी प्रा. केंदळे व कमल घोलप यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)