संभाजी महाराजांना श्रेय देण्यात महाराष्ट्र कमी पडला!

पिंपरी – छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वांनाच माहिती आहे. मात्र निधड्या छातीच्या संभाजी महाराजांना त्यांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला की काय असा प्रश्न मनात येतो, अशी भावना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवड येथे व्यक्त केली.

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आहेर गार्डन येथे प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी डॉ. कोल्हे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अभिनेते शंतनु मोघे, निर्मात्या सोजल सावंत, दिग्दर्शक कार्तिक केंढे, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, उपमहापौर सचिन चिंचवडे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक शाम लांडे, समीर मासुळकर, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, करुणा चिंचवडे, विक्रांत लांडे, अमित गावडे आदी उपस्थित होते.

-Ads-

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी लहानपणापासूनच प्रचंड कुतूहल, आकर्षण आणि प्रचंड अभिमान होता. संभाजी महाराजांची भूमिका साकारायची हे महाविद्यालयापासूनचे स्वप्न होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत हे स्वप्न पूर्णत्वाला आले. महाविद्यालयात असताना विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी माझ्या वाचनात आली, त्यामुळे मी भारावून गेलो. डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील संभाजी महाराजांची भूमिका पाहून संभाजी महाराज अधिकच जवळचे वाटू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वांनाच माहिती आहे. मात्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला असा प्रश्न कायम मनात भेडसावत होता.ज्या लढवय्या राजाच्या बलिदानानंतरही अठरा महिने रयतेने लढा दिला तो राजा असामान्यच होता, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात शाहीर हेरंब पायगुडे यांच्या पोवाडा गायनाने झाली. प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. आभार डॉ. शाम अहिरराव यांनी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)