संभाजी भिडेंवरील दंगलीचे गुन्हे फडणवीस सरकारने घेतले मागे 

मुंबई: कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या विरोधातील दंगलीचे सहा गुन्हे राज्य सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भिडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही भाजप सरकारने दिलासा दिला आहे. भिडे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे सुद्धा सरकारने मागे घेतले असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.
शिवसेना-भाजप कार्यकर्त्यां विरोधात दाखल झालेले गुन्हे सुद्धा सरकारने मागे घेतले आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार या संदर्भात एकूण आठ परिपत्रक राज्य सरकारने जारी केली आहेत. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी 2008 साली जोधा अकबर चित्रपटाला विरोध करताना मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप होता. संभाजी भिडे यांच्यावर त्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पुणे पोलिसांनी 10 सदस्यांची समिती यावर्षी एक जानेवारीला कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी स्थापन केली होती. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या समितीने हिंसाचाराचा ठपका ठेवला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. 2008 पासून किती जणांवरील गुन्हे मागे घेण्यात आले त्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मागितली होती. त्यातून जून 2017 मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती समोर आली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना 2008 ते 2014 दरम्यान एकही गुन्हा मागे घेतला नाही. मात्र जून 2017 ते 14 सप्टेंबर 2018 पर्यंत शेकडो आरोपींवरचे गुन्हे मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)