संबंधित शिक्षकांना न्याय मिळवून देणार

ढेबेवाडी – कराडमधील एका बोगस अल्पसंख्याक संस्थेच्या गैरकारभारामुळे या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या मसूर, ता. कराड येथील इंदिरा कन्या प्रशालेच्या शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्यावर गेली सहा महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. याबाबतचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून बेजबाबदारपणे वक्तव्य केले जात आहे. ही गंभीर बाब असून या संस्थेने ताळतंत्र सोडू नये, असा इशारा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अल्पसंख्याक संस्थेने भोंगळ कारभार केल्यामुळे संस्था चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. या संस्थेने इंदिरा कन्या प्रशाळेत पुरुष मुख्याध्यापकाची बदली करुन महाराष्ट्रात कोठेही अस्तित्वात नसलेला कायदा अल्पसंख्याकाच्या आधारे नवीन निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन तसा आदेश शिक्षणाधिकारी यांची दिशाभूल करुन मिळवली आहे. मात्र ही बाब शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनात येताच त्यांनी सुनावणी घेऊन सदरची मान्यता रद्द केली आहे. असे असतानाही सदर संस्थेच्या संचालक मंडळाने आदेश न पाळल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कायम सेवेत असून सुद्धा पगार मिळालेला नाही.

याविरोधात कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला असता त्यांना गुुंडांकरवी धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. ही बाब अतिरेकाची असून निंदनीय आहे. तुम्ही पगार मागायचा नाही, तो मिळेल तेव्हा मिळेल. नाही तर तुम्ही नोकऱ्या सोडून घरी जा, असे संस्था धमकावत आहे. सुरु असलेला हा प्रकार जिल्हा शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणूनही संबधीत अधिकारी गांधारीची भूमिका घेत आहेत. त्यांनी कठोर निर्णय घेऊन संस्थेला नियमाप्रमाणे काम करण्यास सांगणे क्रमप्राप्त आहे. संस्था जर हे मानत नसेल तर संस्थेवर कार्यवाही करण्याची त्यांची जबाबदारी आहे या सर्व बाबीवर शिक्षणाधिकारी यांनी विचार करुन दखल घ्यावी व योग्य ती कार्यवाही व्हावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)