संधी दिल्यास “ते’ करिअर घडवतील

केंद्रप्रमुख जिजाबा मिंडे : वाळद येथे शालेय बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात

राजगुरूनगर- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी खेळाचे उपजत गुण आहेत. त्यांना संधी दिल्यास खेळात त्यांचे करिअर घडवतील, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख जिजाबा मिंडे यांनी केले.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शालेय बीटस्तरीय स्पर्धा वाळद येथे संपन्न झाल्या, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच रुचिरा पोखरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांताराम जोरी, केंद्रप्रमुख एकनाथ लांघी, शोभा चव्हाण, सुरेखा निकुंभ, सुरेश नाईकडे, हेमंत कारोटे, रामचंद्र तळपे, ज्ञानेश्‍वर वाजे, खंडू काठे, अशोक कोहिणकर, मंगेश वायळ यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
जिजाबा मिंडे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी नैसर्गिक चपळता, चिकाटी, धाडस हे गुण उपजत असतात. सडसडीत बांध्याची लवचिक शरीर रचना त्या अनुषंगाने मेहनत आणि दृढनिश्‍चय या आपल्या गुणांच्या जोरावर भविष्यात यशाचे शिखर गाठतात. खरा खेळाडू यशाने हुरळून जात नाही व अपयशाने खचूनही जात नाही, जिंकणे आणि हारणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणीतरी हरल्याशिवाय कोणीतरी जिंकत नसते. जिंकणे आणि हारणे यातील अंतर थोडसे असते. खेळाडूची हार केव्हा होते जेव्हा तो लढण्याचा संघर्ष सोडून देतो. ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले त्यांनी खचून न जाता कठोर मेहनत व दृढ निश्‍चय डोळ्यासमोर ठेवून पुढील स्पर्धेत उतरावे यश हमखास मिळेल असे त्यांनी सांगितले. वाडा बीटातील आखरवाडी, कमान, सुरकुलवाडी व गुंडाळवाडी या चार केंद्रांतील 400 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. तर अशोक कोहिनकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाची शपथ दिली.
चौकट : तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी/ संघ व (शाळा)
मोठा गट (वैयक्तिक स्पर्धा) – उंच उडी : मुले : किरण वाघ (गुंडाळवाडी), मुली : पूजा तळपे (गुंडाळवाडी). 100 मी.धावणे : मुले : समर्थ पोळ (बुरसेवाडी), मुली : मनीषा पारधी (बुरसेवाडी). लांब उडी : मुले : समर्थ पोळ (बुरसेवाडी), मुली : मनीषा पारधी (बुरसेवाडी). गोळाफेक : मुले : यश पोळ (बुटेवाडी), मुली : तनुजा सुपे (सुरकुलवाडी). वक्‍तृत्व : प्रिया राऊत (आखरवाडी).
लहान गट (वैयक्तिक स्पर्धा) – उंच उडी : मुले : आशिष तळेकर (बुटेवाडी), मुली : भारती गावडे (कान्हेवाडी). 50 मी. धावणे : मुले : अरुण साळुंके (सुरकुलवाडी), मुली : प्राची कोबल (कान्हेवाडी). लांब उडी : मुले : आशिष तळेकर (बुटेवाडी), मुली : अनुष्का मुळूक (विठ्ठलनगर). चेंडूफेक : मुले : आशिष तळेकर (बुटेवाडी), मुली : गुडिया भिल्ल (चास). वक्‍तृत्व : वेदिका बुटे (बुटेवाडी).
मोठा गट (सांघिक स्पर्धा) – कबड्डी : मुले : जि. प. शाळा कमान, मुली : जि. प. शाळा बहिरवाडी. खो-खो : मुले : जि. प. शाळा बहिरवाडी, मुली : जि. प. शाळा, वाळद. लंगडी : मुले : जि. प. शाळा बुटेवाडी, मुली : जि. प. शाळा बुटेवाडी. लेझीम : जि. प. शाळा, गुंडाळवाडी. भजन : जि. प. शाळा चास. लोकनृत्य : जि. प. शाळा, आखरवाडी. लहान गट (सांघिक स्पर्धा) : लेझीम : मुले : जि. प. शाळा, बुटेवाडी, मुली : जि. प. शाळा, बुटेवाडी. भजन : जि. प. शाळा महादेवदरा. लोकनृत्य : जि. प. शाळा, कमान.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव साकोरे, सूत्रसंचालन नीळकंठ कोरडे, तर खंडू काठे यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)