संत मुक्ताई पालखीचे बीड शहरात आगमन

बीड, दि.20 (प्रतिनिधी) – प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी वारीसाठी श्री. क्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून पंढरीकडे प्रस्थान केलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी सकाळी एकादशीच्या मुहूर्तावर शहरात आगमन झाले. बीडकरांनी पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार देतानाच पादुकांचे दर्शन घेऊन मुक्ताबाई मुक्ताबाई, आदीशक्ती मुक्ताबाईचा जयघोष केला. पालखीचा मंगळवारचा मुक्काम माळीवेस येथील हनुमान मंदिरात असून बुधवारी पेठ बीड भागातील बालाजी मंदिरात पालखी विसावणार आहे.

श्रीे. क्षेत्र मुक्ताईनगर आषाढीवारीसाठी संत मुक्ताईंचा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला असून यंदा या पालखी सोहळ्याचे 308 वे वर्षे आहे. दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातून पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले. गेवराईत मुक्काम करुन मुक्ताईंचा पालखी सोहळा बीडमध्ये दाखल झाला. पारगाव जप्ती, पेंडगाव येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात आगमन होताच ठिकठिकाणी विविध सेवाभावी संस्था, व्यापारी यांनी पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार देऊन त्यांची सेवा केली. दुपारी पालखी माळीवेस येथील हनुमान मंदिरात विसावली. पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे, ज्ञानेश्वर महाराज हरणे यांच्यासह संत मुक्ताई संस्थानचे पदाधिकाऱ्यांचे हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. मंगळवारी रात्री माळीवेस मंदिरात कीर्तन होणार असून मुक्ताईंच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. बुधवारी सकाळी धोंडीपुरा, टिळक रोड, जुना बाजारमार्गे पालखी पेठेतील बालाजी मंदिरात मुक्कामी पोहोचणार आहे.

नात घेणार आजोबांचे दर्शन

संत मुक्ताईंचे आजोबा श्री गोविंदपंत कुलकर्णी यांची समाधी शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी किनारी आहे. बालाजी मंदिरातील पंढरीकडे मार्गस्थ होताना नात मुक्ताई आजोबांच्या दर्शनाला जाणार आहेत. मागील दहा वर्षांपासून नात-आजोबांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा हजारो भाविक आपल्या डोळ्यात साठवितात आणि धन्य आजि दिनू सोनियाचा, अमृते पाहिला ही भावना नकळत साऱ्यात भाविकांत निर्माण होते. आजोबा श्री गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी सभागृहात उभारण्यात आले असून संयोजकांकडून नात मुक्ताईला साडीचोळीचा आहेर देऊन ओटी भरली जाते. संपूर्ण राज्यात नात- आजोबांच्या भेटीचा हा अनोखा सोहळा केवळ बीडकरांना अनुभवयास येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)