संत भेट समूह शिल्पाचे काम रखडले

पिंपरी – आळंदी-पुणे या पालखी महामार्गावरील वडमुखवाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराज भेट समूह शिल्प तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेली चार वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची तरतूद करुनही हे काम रेंगाळले आहे. त्यामुळे वारकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

वारकरी सांप्रदायाची आळंदी व देहू ही दोन्ही तिर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत आहेत. राज्य-परराज्यातूनही या दोन्ही ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण होणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथे काही वर्षांपूर्वी महापालिकेने संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे समुह शिल्प तयार केले आहे. संत तुुकाराम महाराजांची भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती एकत्रित आल्याचे या समूहातून दर्शविल्याने आता हा चौक भक्ती-शक्ती चौक या नावाने ओळखला जात आहे. याशिवाय देहू-आळंदी रस्त्यावर मोशी चौकाजवळ वारीत सहभागी झालेली वारकरी महिला व बालकाचे छोटेखानी शिल्प उभारण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आषाढीवारीत संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे महापालिकेच्या हद्दीतून मार्गक्रमण होते. पुण्याकडे प्रस्थान करताना मार्गातील पालखी सोहळ्यातील पहिली आरती वडमुखवाडी येथील ज्ञानेश्‍वर महाराज धाकट्या पादुका मंदिरात होते. त्यामुळे याठिकाणी असलेल्या विस्तीर्ण दोन एकर जागेवर महापालिकेच्या वतीने चार वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराज भेट समूह शिल्प साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या समूह शिल्पात एकूण 26 मूर्तींचा समावेश आहे. या शिल्पातील प्रत्येक मूर्तीचे वजन, उंचीची पडताळणी राज्य सरकारच्या कला संचालनालयाकडून केली जात आहे. सुरुवातीला या समूह शिल्पाकरिता सव्वा कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, कला संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केल्यानंतर, दूर अंतरावरुन या मूर्ती दृष्टीस पडाव्यात, याकरिता यापैकी सहा मूर्तीची उंची 22 फुटांपर्यंत वाढविण्याचे सुचविले. त्यामुळे या शिल्पाचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. आता चौथऱ्याकरिता 1 कोटी 25 लाख रुपये, मूर्ती तयार करण्यासाठी 6 कोटी 70 लाख रुपये व इतर अशा एकूण 9 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यानच्या काळात पुणे-आळंदी रस्त्यावर महापालिकेच्या वतीने बीआरटीएस मार्ग विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे हे समूह शिल्प वाय जंक्‍शनच्या जागेत तयार केले जाणार आहे. त्यामुळे या शिल्पाकरिता दोन एकर पैकी साठ गुंठे जागा उपलब्ध झाली आहे. त्यावर हे शिल्प साकारले जाणार आहे. त्यामध्ये मूर्तींबरोबरच ऍम्फी थिएटर व गार्डनचा देखील समावेश करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वारीसोबत चालताना भक्तीभावाचे वातावरण तयार व्हावे, याकरिता हे समूह शिल्प तयार करण्याचे नियोजन आहे. मात्र, दिवसें-दिवस हे काम रेंगाळत असून, या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे.

आषाढी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पाबरोबरच पुणे-आळंदी रस्त्यावरील संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराज भेट समूह शिल्पामुळे शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. या समूह शिल्पाच्या कामाकरिता मुबलक तरतूद करण्यात आली आहे. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल.
– नितीन काळजे, महापौर पिंपरी-चिंचवड महापालिका.

भक्ती-शक्ती समूह शिल्पाच्या धर्तीवर शहरात एक देखणे शिल्प उभारण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात आपण स्वत: या संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत नामदेव महाराज समूह शिल्पासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी तज्ज्ञांची समिती देखील नेमण्यात आली होती. याशिवाय या शिल्पातील सर्व मूर्तींकरिता राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या आवश्‍यक परवानग्या मिळविल्या आहेत. मात्र, नागरिकांना संतांच्या विचारांची प्रेरणा देणाऱ्या या नियोजित शिल्पाकडे भाजपच्या काळात दुर्लक्ष झाले, ही दुर्देवी बाब आहे. त्यामुळे नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍न पडला असून, हे शिल्प रखडल्याने भाजप पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
– विलास लांडे, माजी आमदार, भोसरी विधानसभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)