संत तुकोबा पालखी सोहळ्याची देहूत सांगता

देहुरोड – जगद्‌गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 36 दिवसांच्या आषाढ वारीनंतर दुपारी अडीचच्या सुमारास देहूत आगमन झाले. देहूकरांनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे भक्‍तीमय आणि आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहाने स्वागत केले. संस्थानने सोहळ्यातील भाविकांचे आभार मानल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली.

पहाटे नित्यपूजेनंतर पिंपरीगाव येथील श्री भैरवनाथ मंदिर येथून पालखी सोहळा देहूगावकडे मार्गस्थ झाला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. महिलांची गर्दी लक्षणीय होती. सुवासिनींनी वारी पूर्ण केलेल्या वारकऱ्यांसह पालखी रथाच्या बैलजोडीलाही औक्षण केले. वेशीजवळ भक्‍तीभावाने दही-भाताचा नैवद्य रामचंद्र तुपे कुटुंबियाने दाखवला.

-Ads-

श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे, विठ्ठल बाबुराव मोरे, विश्‍वस्त अभिजित बाळकृष्ण मोरे, सुनील दिगंबर मोरे, जालिंदर विश्‍वनाथ मोरे, संस्थानचे माजी अध्यक्ष, विश्‍वस्त, महाराजांचे वंशज यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय चौकात रथातून पालखी खांदेकऱ्यानी खांद्यावर घेताच नभात मेघराजानीही दर्शनाथ घेर धरले. ग्रामस्थ भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती.

श्री शिवाजी चौकाजवळील हनुमान मंदिरासमोर अभंग झाले. पालखी मार्गाने सोहळा निघाला. जन्मस्थानाजवळ आणि शिळा मंदिरासमोर आरती झाली. पालखी मुख्य मंदिरात आल्यानंतर दिलीप नारायण मोरे यांनी जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज पादुका डोक्‍यावर घेतल्या. त्या श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आणल्यावर दिलीप मोरे यांच्या हस्ते आरती झाली. आरतीनंतर वारकऱ्यांनी “पुंडलिका वर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ नामाचा जयघोष करून पताका उंचवून तुतारी, शंख, नगारा व ताशाच्या गजर व नाद केला. मंदिराच्या परिसरातील वातावरण यावेळी भक्‍तीमय झाले होते. चांदीची अब्दागिरी, गरूड टक्‍के, सावलीते रेशमी छत्र, पालखी खांद्यावर घेऊन देऊळ वाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली.

प्रदक्षिणेनंतर पादुका मंदिरातील भजनी मंडपात आणण्यात आल्या. भजनी मंडपात पालखीचे सेवेकरी, मानकऱ्यांसह सर्व दिंडी चालकांना संस्थानने नारळ प्रसाद देऊन सत्कार केला. एकादशीचा फराळ महाप्रसादाचे वाटप केले. बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल, आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्‍टर व आरोग्य कर्मचारी यांचे संस्थानने आभार मानले. यावर्षी पालखी परतीवर देखील मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविकांची उपस्थिती होती. पालखी मार्गावरील वाहने थांबवण्यात आली होती. पिंपरीगाव ते देहुगाव मार्गावर देहुरोड पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी चिंचोली येथील शनी मंदीर येथे संत तुकाराम अन्नदान मंडाळाने एकादशीनिमित्त वारकऱ्यांना साबुदाणा खिचडी वाटप केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)