संत गजानन महाराजांच्या पालखी आगमनाने बीड ‘भक्तीमय’

 

 

बीड – राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरु गजानन महाराज की जय ,गण गण गणात बोते, टाळ मृदंगाच्या तालात अंभगाच्या जयघोषाने रविवारी बीड शहर दुमदुमून गेले. निमित्त होते श्री गजानन महाराज पालखी आगमनाचे. पंढरीची आषाढीवारी उरकून गजानन महाराजांची पालखी शेगावला परतत आहे. या पालखीचे सकाळी बीड शहरात आगमन झाले. भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने पालखीचे स्वागत केले.

आषाढीवारीसाठी शेगावहून पंढरपूरला गेलेली श्री. गजानन महाराजांची पालखी काल्याचा प्रसाद घेऊन आता परतीच्या मार्गावर आहे. शनिवारी पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन झाले. पाली येथे मुक्काम करुन रविवारी सकाळी वारकरी बीडकडे मार्गस्थ झाले. बार्शीनाका, बलभीम चौक़, माळीवेस, सुभाष रोड मार्गे पालखी सोहळा कंकालेश्वर मंदिरात पोहोचला. तेथे वारकरी विसावले.

दोन घोडे, गजानन महाराजांच्या पादूका असलेला रथ, खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ- मृदंग अन्‌ मुखी विठुरायाचे नाम… अशा भक्तीमय वातावरणातील या पालखी सोहळ्याचे बीडमध्ये ठिकठिकाणी स्वागत झाले. अनेकांनी पालखीमार्गावर रांगोळी काढली. सामाजिक संस्थांच्या वतीने वारकजयांना अल्पोपहार, पाणी देण्यात आले. पादुका दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. पालखीच्या शेवटी खेळण्यांचे गाडे होते. खरेदीसाठी बीडकरांची झुंबड उडाली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)