संतांनी अध्यात्मिक लोकशाही निर्मिली

आळंदी – संत आणि संत साहित्य म्हणजे टाळकुटेपणा नसून त्याचे मूल्यमापन खोलवर रूजले आहे. ते प्रवाही आहे. संतांना त्यांच्या कर्मामुळे लोकांनीच संतपद बहाल केले आहे. संतांनी अध्यात्मिक लोकशाही निर्माण करून सर्वसामान्यांना अध्यात्माची वाट मोकळी करून दिली, अशी भावना लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका, लेखिका आणि आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन शुक्रवारी (दि.13) ज्येष्ठ कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
या तीन दिवसीय संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यासपीठावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, सुनीताराजे, विश्वस्त योगेश देसाई, ह.भ.प.शांतीब्रम्ह मारूती महाराज कुऱ्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भवाळकर म्हणाल्या, मध्ययुगीन जीवनातील भौतिक वातावरण ही संतांची मर्यादा ठरली, हे मान्य करूनसुद्धा त्यांनी मुक्तीचा पहिला कंठस्वर जिवाच्या आकांताने उमटवला. लौकिक जीवनात विवाहसंस्थेने आणि नवऱ्याने स्त्रीच्या पायात सगळयात भक्कम बेडी अडकवली आहे, हे वास्तव सत्यच त्यातून व्यक्त होते. ती बेडी तोडणे म्हणजे स्वैरिणीचा शिक्का मारून घेण्याचे धाडस करणे होय. अन्‌ प्रपंचातून मुक्ती हवी असेल तर स्वैरिणी होण्याची तयारी ठेवायला हवी, हेच संत सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)