संतांची कृपा झाल्यावर सत्यमार्ग सापडतो

उल्हास सुर्यवंशी महाराज : भगूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह
शेवगाव  – संताची कृपा झाल्यावर पाप करण्याची उर्मी नाहिसी होऊन मनुष्य जीवनाचा सत्यमार्ग सापडतो. जीवन संपन्न असले तरी जीवन सफल होण्यासाठी सदगुरूची आवश्‍यकता असते. असे मत उल्हास महाराज सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
भगूर (ता.शेवगाव) येथे वैराग्य मुर्ती सत्यविजय महाराज यांचे गुरूपूजन व चातुर्मास त्रितपपुर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील सहावे पुष्प गुंफताना किर्तनरूपी सेवेत ते बोलत होते. सत्यविजय महाराज, जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख हभप राम महाराज झिंजुर्के, लक्ष्मण महाराज भवार, राजू महाराज काटे, प्रविण महाराज आदी उपस्थित होते.
सत्यगुरू राये कृपा मज केली, परि नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण त्यांनी केले. सुर्यवंशी महाराज म्हणाले, तुम्ही ज्ञानी, पंडित असाल, जीवनात संपन्न असेल तरी जीवनाच्या यशस्वीतेसाठी सदगुरूची गरज आहे.
संत तुकाराम महाराज यांनी माया, मोह मिथ्या मानून त्यावर विजय मिळविला होता. त्यांच्या चित्तात अर्थ, काम, मानामानाची चाड नव्हती. अशा सदगुणी भक्ताला सदगुरू शोधत येतो. आशिर्वाद वेगळा अन्‌ कृपा वेगळी. संत सर्वसामान्यांना आशिर्वाद देतात. परंतु, भक्त व शिष्यांवर संताची कृपादृष्टी असते. संताच्या कृपादृष्टीत प्रचंड सामर्थ्य असून ते जीवन सफल तर करतात, प्रपंचातील निरर्थक बाबींचा वीट येऊन परमार्थाचा ध्यास अन्‌ परमात्म्याच्या दर्शनाची आस लागते. खरे सदगुरू हे भगवान परमात्म्याचे दर्शन घडवितात. सत्यविजय महाराज यांनी 36 वर्षे परमार्थिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा त्यांनी गौरव केला. भगूर, वरूर, शेवगाव, अमरापूर, सुसरे, आखेगाव, वडुले बुद्रुक, सुसरे आदींसह विविध गावांतील भाविक हजोरोंच्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)