संतवाणीचा साबण… 

डॉ. न. म. जोशी 

संत सुजनदास नावाचे एक सत्पुरुष होते. गावोगाव प्रवचने करून ते लोकांचं प्रबोधन करीत. कुणी त्यांचे चांगले विचार ग्रहण करीत, कुणी नुसतेच ऐकून सोडून देत. सुजनदास मात्र आपलं कार्य करीतच होते.
एकदा सुजनदास पायीच एका गावाहून दुसऱ्या गावाला चालले होते. वाटेत एक गृहस्थ त्यांना भेटले. दोघेही विश्राम करण्यासाठी एका वृक्षाखाली पारावर बसले. ते गृहस्थ व्यापारी होते. त्यांचा साबणाचा व्यवसाय होता. गृहस्थ मोठे चिकित्सक होते. ते सुजनदास यांना म्हणाले…

“सुजनदासजी, आपण सत्पुरुष आहात. आपली ख्याती मी ऐकली आहे. आपण उत्तम प्रवचने करता. आपणाबद्दल मला आदर आहे. पण मला एक शंका आहे.’
“कसली शंका? मनात काही ठेवू नका. आपण अवश्‍य विचारा.’
“आपल्यासारख्या सत्पुरुषाबद्दलच ती शंका आहे. विचारू का नको असं वाटतं.’
“माझ्याबद्दल शंका? मग तर अवश्‍य विचारा,’ सुजनदास म्हणाले.
“आपण जितके दिवस सत्संग करीत आहात प्रवचने देता आहात. पण समाजात भ्रष्टाचार, अनाचार, गुंडगिरी, अपप्रवृत्ती आहेच. आपल्या प्रवचनांचा काय उपयोग?’
एवढ्यात समोरून एक शेतकरी जाताना दिसला. त्याचे कपडे खूप मळलेले होते. संत सुजनदास यांनी त्याच्याकडे निर्देश केला आणि विचारलं.
“आपण साबण बनवता. साबण विकता. मग या शेतकऱ्याचे कपडे इतके मळलेले कसे? आपल्या साबण बनविण्याचा काय उपयोग?’

“सुजनदासजी, मी साबण बनवतो. पण लोकांनी त्याचा उपयोग करायला हवा ना. हा शेतकरी मी केलेला साबण घेऊन कपड्यांवर घासेल तर त्याचे कपडे नक्‍कीच स्वच्छ होतील. त्यानं उपयोग केला तर माझ्या साबणाचा उपयोग. यात साबणाचा दोष नाही किंवा माझाही नाही.’
“होय ना? मग आपण मघाशी जी शंका विचारली तिचे उत्तर हेच आहे.’
“ते कसं काय?’ साबण दुकानदाराने आश्‍चर्याने विचारले. “आपण साबण बनवता पण उपयोग करणाराच करतो.’ “बरोबर. तसेच आहे. मी प्रवचने देतो. सत्संगात लोकांचं प्रबोधन करतो. पण त्याचा उपयोग करणाऱ्यांनाच आपलं जीवन सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. माझा सद्विचारांचा साबण तयार असतो. कुणी घ्यावा किंवा न घ्यावा.’
साबणवाल्याचे डोळे उघडले. तो म्हणाला,
“माफ करा सुजनदासजी, मी आपल्याला उगाच प्रश्‍न विचारला.’

कथाबोध 
जगात सर्वत्र चांगल्या गोष्टी आहेत. पण त्यांचा उपयोग करून घेणाऱ्यालाच त्याचा आनंद मिळेल. फूल आहे पण त्याचा वास घेणाऱ्यालाच तो मिळेल. संगीताचे सुस्वर आहेत पण कान देऊन ऐकणाऱ्यालाच त्याचा आनंद घेता येईल. सुंदर विचार असलेले ग्रंथ आहेत पण ते उघडून वाचणाऱ्यालाच त्यातील सुंदर विचारांचा आनंद मिळेल.
निसर्गसृष्टीचं खुलं सौंदर्य डोळे उघडे ठेवून रसिकतेनं घेणाऱ्यालाच मिळेल. थोडक्‍यात, देणारा आहे, पण घेणाराही तसाच हवा. रसिक, भुकेला, जिज्ञासू!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)