संतप्त शेतकऱ्यांकडून “संत तुकाराम’च्या कार्यालयास टाळे

पिंपळे जगताप, करंदीसह परिसरात शेतकरी आक्रमक

शिक्रापूर- शिरूर तालुक्‍यातील पिंपळे जगताप, करंदी वाजेवाडीसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीअभावी जळून चालला आहे. तरी देखील ऊस नोंदणी केलेला कारखाना दखल घेत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळे जगताप येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. पिंपळे जगताप, करंदी वाजेवाडी परिसरातील 230 शेतकरी हे मुळशी तालुक्‍यातील कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. परिसरातील तीनशे एकर उसाचे क्षेत्र या कारखान्याकडे नोंदविलेले आहे. परंतु अनेक दिवसांपासून या परिसरात कारखान्याच्या ऊस तोड काम करणाऱ्या फक्‍त दोनच टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपासून या भागातील फक्‍त 30 एकर ऊस तोडला गेला असल्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेकदा कारखाना प्रशासनाशी चर्चा करूनही दखल घेत नाहीत. त्यांनी या भागातील ऊस तोडणीसाठी सात टोळ्या देण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्यापपर्यंत टोळ्या न आल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पिंपळे जगताप येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव बेंडभर, सोसायटीचे चेअरमन शंकर शेळके, सुंदरलाल दौंडकर, मोहनराव टाकळकर, अशोक शेळके, स्वप्नील शेळके, सुधीर भोसले, पप्पू सोंडेकर, आबासाहेब तांबे यांसह आदी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. तर जोपर्यंत परिसरात कारखान्याकडून ऊस तोड कामगारांच्या टोळ्या येत नाहीत. तोपर्यंत आम्ही कारखान्याचे येथील कार्यालय सुरु करू देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक यांनी या भागासाठी दोन टोळ्या देण्याचा शब्द दिला आहे. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचविल्या असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे कारखान्याचे विभागप्रमुख भिवाजी मोरे यांनी सांगितले.

  • तर कारखान्यावर आंदोलन करू – उत्तमराव बेंडभर.
    बारा वर्षापूर्वी णघ कारखान्याने न्यायालयाकडून आमची गावे त्यांच्या कार्यक्षेत्रात जोडून घेतली आहेत, तेव्हापासून आम्ही या कारखान्याला ऊस देत आहे. आता दुष्काळ असताना आमचा ऊस तोडणीअभावी जाळून चालला आहे. परंतु आता दोन दिवसांत कारखान्याकडून टोळ्या आल्या नाहीत तर आम्ही कारखान्यावर आंदोलन करू, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव बेंडभर यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)