संतप्त ग्रामस्थांकडून शहापुरात हॉस्पिटलची तोडफोड

सातारा, दि. 20(प्रतिनिधी) – युवकाच्या उपचारात हलगर्जीपणा करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा समज झाल्याने शहापुर ता. सातारा येथील संतप्त ग्रामस्थांनी समर्थ मंदिर परिसरातील शिंदे हॉस्पिटलची मंगळवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान तोडफोड केली. या तोडफोडीत हॉस्पिटलचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप या प्रकरणी कोणासही अटक झालेली नाही. तोडफोड करणाऱ्यांच्या शोधार्थ तपास पथके रवाना करण्यात आले आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद शंकर सकटे वय 21 रा. शहापुर हा द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी असून सकाळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे उपचारासाठी समर्थ मंदिर परिसरातील डॉ. संजय शिंदे यांच्याकडे दाखल झाला. डॉक्‍टरांनी तपासणी करुन त्याच्या हृदयाचा ईसीजी काढला. रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगत त्याला खबरदारीचा उपाय म्हणून काही औषधे दिली. मात्र दुपारी सकटे याला अचानक चक्‍कर येऊन तो पडल्याने कुटुंबियांनी धावत पळत त्याला समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांनी त्याला तेथे मृत घोषित केल्याने सकटे कुटुंबियांना एकच धक्‍का बसला. त्यांनी डॉक्‍टरांकडून माहिती घेतली असता हृदयातील काही शिरांना त्रास झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

त्यामुळे डॉ. संजय शिंदे यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा समज होऊन शहापुर येथील ग्रामस्थांनी त्या हॉस्पिटलची तोडफोड केली. या तोडफोडीत फर्निचरचे नुकसान झाले. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. घटनेची खबर कळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी कायद्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे आणि तोडफोड करणाऱ्यांच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)