संतपीठ अभ्यास”वारी’ लांबणीवर!

पिंपरी- चिखली येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ उभारले जाणार आहे. या संतपीठाचा आराखडा व त्यातील आवश्‍यक सोयी-सुविधा, संत साहित्य, वाडःमयाची रचना आदी माहिती मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अभ्यास दौरा आयोजित केला होता. मात्र, अभ्यासवारी रखडल्याने संतपीठाचा आराखडा लांबणीवर पडला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय वर्गातून नाराजीचा सूर आहे.

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा. वारकरी संप्रदायाचे पारंपरिक शिक्षण जनमानसांना मिळावे म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यातील पहिले जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली या ठिकाणी उभारण्याचा संकल्प केला आहे. या संतपीठ उभारणीला दि. 13 मे 2015 रोजी महापालिका सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. त्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली चिखली येथील सर्व्हे क्रमांक 1653 मधील 1 हेक्‍टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठात सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश देवून त्या संतपीठात मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. या संतपीठाचा अभ्यासक्रम काय असावा? हे ठरविण्यासाठी समितीही नेमली आहे. यामध्ये संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, श्री क्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे विश्‍वस्त अभय टिळक आणि वारकरी शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त हभप दिनकर शास्त्री यांचा समावेश केला आहे.

संतपीठाच्या इमारतीचे स्ट्रक्‍चर, त्यातील अभ्यासक्रमाचा आराखडा, अभ्यासाची रचना, संतपीठात राहणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था, वर्ग खोल्यांची रचना, संत साहित्याची माहिती, अध्यात्मिक शिक्षण, ते उपलब्ध असणारी ठिकाणी, सर्व संतांचे वाडःमय एकत्रित मिळण्याची ठिकाणी, या संतपीठातून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांचे भवितव्य आदी बाबींचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने दौरा करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यात आमदार, पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त तानाजी शिंदे यांच्यासह विविध दहा अभ्यासक सहभागी होणार आहेत.

दरम्यान, संतपीठाला पालिकेने मान्यता देवून अडीच वर्षे लोटली आहेत. संतपीठासाठी शाळेचे आरक्षित जागाही भूसंपादित करण्यात येत आहे. मात्र, संतपीठाचा डीपीआर बनविण्यास अभ्यास समितीच्या सदस्यांना अभ्यास वारीला वेळ मिळेना झाला आहे. त्यामुळे संतपीठाचा आराखडा बनविण्यास विलंब होवू लागला आहे. हा अभ्यास दौरा झाल्याशिवाय आराखडा तयार करता येणार नसल्याचे पालिका प्रशासकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अभ्यासवारी पूर्ण झाल्याशिवाय संतपीठाच्या कामाला गती मिळणार नाही, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

…असा आहे अभ्यास दौरा
महापालिकेने संतपीठाचा आराखडा बनविण्यासाठी देशभर अभ्यास दौरा केला जाणार आहे. यामध्ये सर्व अभ्यासक हरिद्वारचे पतजंली संस्कृत गुरुकुलम, गुरुकुलम कांगडी नोएडा (दिल्ली), महेश योगी गुरुकुल नांगलोई, सुधांशू गुरुकूल, साध्वी ऋतंभरा वृंदावन, संविध गुरुकुल, आग्रा रोड यमुना महामार्गावरील मायावती गुरुकुल, ओडिशाचे श्री श्री युनिव्हर्सिटी, कटकचे गोदी साही आदी विद्यापीठांना भेटी दिल्या जाणार आहेत.

 

आषाढीवारी सोहळ्यामुळे आम्ही सर्वजण व्यस्त होतो. आता सोहळा संपला आहे. त्यामुळे संतपीठाचा दौऱ्याचे लवकरच नियोजन करण्यात येईल. त्यानूसार दौरा पूर्ण करुन अभ्यासाचा अहवाल महापालिका प्रशासनाला सादर करण्यात येईल.
– सदानंद मोरे, संत साहित्यांचे अभ्यासक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)