संतपीठाच्या संचालक मंडळापासून राजकीय व्यक्‍ती दूर

पिंपरी – टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज संतपीठामध्ये सीबीएससी बोर्डाचे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेतर्फे संचालक मंडळाची रचना जाहीर करण्यात आली असून त्यात राजकीय व्यक्तींना यापासून दूर ठेवण्यात आले आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका विधी समितीची विशेष सभा मंगळवारी (दि. 8) बोलविण्यात आली आहे.

संतपीठ उभारणीला 13 मे 2015 रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आल्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील 1 हेक्‍टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतीगृह, सभागृह, अभ्यास वर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुमारे 45 कोटी रुपये इतका खर्च या संतपीठ उभारणीसाठी येणार आहे. यामध्ये मुलांना अध्यात्मिक आणि आधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण दिले जाणार असून त्यासाठी सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमांचा स्विकार करण्यात येणार आहे. तशी फेरबदल करण्याची तरतूद सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमातच आहे. कंपनीमध्ये संचालक व सदस्यांची नियुक्ती करणे, कंपनी व्यवस्थापनासाठी मसुदा मान्य करण्यास संचालकांना अधिकार देणे, नवीन अधिकारी संचालक व सदस्यांची डिजीटल सिग्नेचर आणि ओळख क्रमांक तयार करून घेणे, कंपनी स्थापनेनंतर अभ्यासक्रम निश्‍चित करणे, संचालक मंडळातर्फे सीबीएससी बोर्डाची मान्यता घेणे आदी विषयावर विधी समिती सभेत चर्चा करून त्याची शिफारस महापालिका सभेत करण्यात येणार आहे.

कंपनीचे संचालक मंडळ
जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ या नावाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही कंपनी स्थापन करण्यात आली असून महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांचे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. आयुक्त हर्डीकर हे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत, तर पदसिद्ध संचालक आणि पदसिद्ध सचिव म्हणून अनुक्रमे महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे असणार आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी पराग मुंढे आणि कायदा विभागाचे प्रभारी कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर हेही पदसिद्ध सदस्य असणार आहेत. या व्यतिरिक्त संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, हभप राजू महाराज ढोरे, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी शिंदे आणि तज्ज्ञ सल्लागार स्वाती मुळे हे या कंपनीचे सदस्य असणार आहेत. मेसर्स के. जे. एल. ऍण्ड असोशिएटस्‌चे क्षितीज लुंकड कंपनीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)