संतपीठाच्या मसुद्यात समितीचे चित्र स्पष्ट होणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुचर्चित संत तुकाराम महाराज संतपीठाबाबत स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र कंपनीकडून संतपीठाचा मसुदा तयार केला जाणार आहे. त्यामुळे या समितीमधील सदस्यांची संख्या, महापालिका पदाधिकारी, अथवा बिगर राजकीय सदस्यांना स्थान मिळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

महापालिकेच्या वतीने चिखलीमध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाविषयी समाजातील मान्यवरांना उत्सुकता आहे. संतपीठ समिती सदस्य निवडीबाबत झालेल्या बैठकीत संतपीठ आणि त्याअनुषंगाने शाळा व्यवस्थापनासाठी कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. “ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कंपनीची स्थापना केली जाणार असून आयुक्त श्रावण हर्डीकर पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विधी समितीमार्फत महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. कंपनीचे सचिव सतीश लुंकड हे कंपनी नोंदणीकृत करणे व त्या अनुषंगिक कामकाज पाहणार आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये उभारण्यात येणाऱ्या या संतपीठ उभारणीला 13 मे 2015 रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आली. कामासाठी येणाऱ्या 45 कोटीच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या समितीमध्ये महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांचा समावेश केला नसल्याने, या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती. मात्र, या संतपीठासाठी स्थापना करण्यात येणाऱ्या विशेष कंपनीकडून या संतपीठाचा मसुदा तयार केला जाणार आहे. त्यामध्ये सदस्य निवडीचे निकष, त्यांची शैक्षणिक पात्रता, संख्या, कालावधी या सर्व बाबींचा समावेश केला जाणार आहे.

“सीबीएसई’ की माध्यमिक मंडळाची मान्यता?
माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील 1 हेक्‍टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या आरक्षित असलेल्या जागेवर संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च पदवीपर्यंतचे केवळ संत साहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतीगृह, सभागृह, अभ्यास वर्ग आदींचा समावेश असणार आहे. मात्र, या शैक्षणिक संस्थेला केंद्र सरकारच्या “सीबीएसई’ की राज्य सरकारच्या माध्यमिक विभागाची मान्यता घेतली जाणार आहे, याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)