संतपीठाच्या निविदेची सीआयडी चौकशी करा

पिंपरी – टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या निविदेमध्ये सत्ताधारी पदाधिकारी, पालिका अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांनी रिंग करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत या कामाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलातर्फे करण्यात आली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सेवादलाचे शहराध्यक्ष आनंदा यादव यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भागवत धर्माचा प्रसार अन्‌ प्रचार व्हावा, वारकरी सांप्रदायाचे पारंपारिक शिक्षण जनमाणसांना मिळावे, यासाठी टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला. त्याचप्रमाणे टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून शेजारीच श्री क्षेत्र आळंदी, देहू या तिर्थक्षेत्रांचे सानिध्यही लाभले आहे. त्यामुळे या संतपीठ उभारणीला 13 मे 2015 रोजी झालेल्या महासभेने मान्यता दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संतपीठाच्या कामासाठी महापालिका स्थापत्य विभागाने 40 कोटी 61 लाख 3 हजार 125 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या असून त्यामध्ये मेसर्स एस. एस. साठे यांनी 16 टक्के, व्ही. एम. मातेरे यांनी 14 टक्के, तर बी. के. खोसे यांनी 11.16 टक्के जादा दराने निविदा भरल्या आहेत. यामध्ये रिंग झाली असून या जादा दराच्या निविदा कमी करून घेण्यासाठी स्थापत्य विभाग किंवा आयुक्त हर्डीकर यांच्याकडून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.

बी. के. खोसे यांनी मूळ निविदा, त्यात रॉयल्टी व मटेरिअल टेस्टिंग चार्जेस असे एकूण 45 कोटी 8 लाख 97 हजार रुपयांमध्ये काम करण्याचे मान्य केले असून या प्रस्तावाला स्थायी समिती सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. मात्र, या जादा दराच्या निविदेमुळे तब्बल चाडेचार कोटीचा खर्च अधिक वाढला आहे. त्यामुळे निविदा भरताना रिंग करून भरण्यात आल्या असल्याने त्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत तक्रारी करूनही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे जादा दराच्या निविदांमधून गैरव्यवहार झाला असून त्यातून ठेकेदाराशी मिलिभगत करून आर्थिक हित साधले जात आहे. म्हणून या कामाची सीआयडी मार्फत चौकशी करावी, असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)