संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणे फुल्ल

संग्रहित छायाचित्र

उजनीत 95 टक्के पाणीसाठा, मुळशीतून सर्वाधिक विसर्ग

पुणे – गेले तीन ते चार दिवसांपासून संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणे भरली असून त्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. दोन दिवसापुर्वी साठ टक्के साठा असणाऱ्या उजनी धरणात आज तब्बल 95 टक्के साठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या धरणामधून सुध्दा विसर्ग सुरु होण्याची शक्‍यता आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात गेले तीन ते चार दिवसांपासून संततधार आहे. विशेषतः घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असून त्यातून विसर्ग सुरु झाला आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील मुळशी धरणातून सर्वाधिक म्हणजे 25 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्याशिवाय खडकवासला धरणातून 4280 क्‍युसेक्‍स तर पवना मधून 4 हजार 570 क्‍युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर डिंभे, चासकमान, कासारसाई, निरा-देवधर, भामा-आसखेड याशिवाय अन्य धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात विसर्ग सुरु आहे. हे सर्व पाणी भिमा नदीतून वाहत उजनी मध्ये जमा होत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या धरणामध्ये 50.12 टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे.पावसाचा जोर आणखी दोन दिवस असाच राहिला तर उजनी धरणांमधून सुध्दा विसर्ग सुरु करावा लागेल अशी शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)